Coronavirus Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

COVID-19 Vaccination: राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 10 हजार 187 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 47 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 22 लाख 08 हजार 586 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 52 हजार 440 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लसीकरण (COVID-19 Vaccination) मोहीम राबवण्यात येत आहे. मुंबईमध्ये लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. मात्र, आज म्हणजेच रविवार, दिनांक 7 मार्च 2021 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात लसीकरण होणार नाही. यासंदर्भात BMC ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून माहिती दिली आहे.

देशात कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोविड योद्ध्यांना लस देण्यात आली. त्यानंतर 1 मार्चपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला. यात 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तसेच 45 ते 59 वर्षे वयोगटातील विशिष्ट आजार झालेल्या व्यक्तींना कोविडची लस देण्यात येत आहे. (वाचा - Mumbai: 100 वर्षांच्या आजींनी कोरोनाची लस घेतल्यानंतर, कोविड सेंटरमध्येच साजरा केला 100 वा वाढदिवस (Watch Video))

दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी केंद्र सरकारने देशभरातील सरकारी आणि खासगी अशा एकूण 10 हजार रुग्णालयांची यादी जाहीर केली होती. या यादीत महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांमधील रुग्णालयांचा समावेश आहे. त्यामुळे नागरिकांना या रुग्णालयांमध्ये करोनाची लस घेता येणार आहे.

याशिवाय मुंबईतील 29 खासगी रुग्णालयात कोरोनाची लस उपलब्ध असणार आहे. मुंबई महापालिकेने यापूर्वी या रुग्णालयांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार, नागरिक या रुग्णालयात जाऊन कोरोना लस घेऊ शकतात. महानगरपालिकेच्या रुग्णालय तसेच केंद्र आणि राज्य शासनाने निर्धारित केलेल्या रुग्णालयांमध्ये लसीकरण विनामूल्य केले जाणार असून खासगी रुग्णालयात लसीकरणासाठी प्रत्येक डोससाठी 250 रुपये आकारले जाणार आहेत.