WhatsApp (Photo Credit: File/PTI)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे.कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून (Social Media) खोट्या माहितीचा (Fake News) प्रसार करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात अनेक घटना समोर आल्या आहेत. यातच अहमदनगर (Ahmednagar) येथे व्हॉट्सऍपवरच्या माध्यमातून चुकीची माहिती व्हायरल केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर भिंगार कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर येथील फकीरवाडा भाग मिल्ट्रीच्या हातात देणार, अशी माहिती संबंधित व्यक्तीने व्हॉट्सऍपवरून व्हायरल केली होती. यामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले होते. ही गोष्ट पोलिसांच्या लक्षात येताच, त्यांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई केली.

ताहिर शेख असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो अहमदनगर येथील रहवासी आहे. ताहिर याने 29 मार्च रोजी मुकुंदनगर फकीरवाडा भाग मिल्ट्रीच्या हातात देणार, अशा संदर्भातील मॅसेज एका व्हॉट्सऍप ग्रुपवर व्हायरल केला होता. यामुळे अहमदनगर परिसरात संभ्रम निर्माण झाले होते. कोरोना विषाणूसंदर्भात कोणतीही चुकीची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करून नका, असे आदेश जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, ताहिर याने जिल्ह्याधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करुन व्हाट्सऍपवर चुकीची माहिती पसरवली. याप्रकरणी मुकुंदनगर येथील भिंगार कॅम्प पोलिसांनी ताहिरवर मंगळवारी रात्री गुन्हा दाखल केला. तसेच कोरोना संदर्भात सोशल मीडिया अथवा इतर माध्यमांद्वारे खोटे मॅसेज टाकून अफवा पसरवली तर, कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. हे देखील वाचा- Coronavirus: कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय; मुंबईतील 146 परिसर सील

जगभरात कोरोनाबाधीतांची संख्या 6 लाख 97 हजार 244 वर पोहचली आहे. यांपैकी 32 हजार 257 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 45 हजार 696 रुग्ण बरे झाल्याची माहिती समोर आली आहे. आता भारतही कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकत चालला असल्याची चिन्ह दिसू लागली आहे. भारतात आतापर्यंत एकूण 1 हजार 251 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 32 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 101 लोक बरे झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 320 वर पोहचली आहे. यात 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 35 रुग्ण कोरोना विषाणूच्या जाळ्यातून बाहेर आल्याचे समजत आहे.