कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावात राज्य सरकार सतर्क झालं असून त्या दृष्टीने पाऊल उचलायला सुरुवात केली आहे. दिल्ली-एनसीआर, राजस्थान, गोवा, गुजरात या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना कोविड-19 ची RT-PCT टेस्ट निगेटीव्ह असणे बंधनकारक आहे. मात्र ठाकरे सरकारने हे नियम केवळ प्रवाशांना लागू केले आहेत. विमान आणि विमानतळावरील क्रु मेंबर्ससाठी कोविड-19 चा निगेटीव्ह टेस्ट रिपोर्ट दाखवणे अनिवार्य नाही. दरम्यान, हे नियम केवळ विमान प्रवाशांना नाही तर रेल्वे मार्गाने वाहतूक करणाऱ्या प्रवाशांनीही पाळणे सक्तीचे आहे.
महाराष्ट्राचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी विमान क्रु मेंबर्संना या नियमातून मुक्ती देण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात राज्य सरकारला एअर इंडियाकडून एक विनंती करण्यात आली आहे. त्यात असे म्हटले आहे की, वन्दे भारत अभियानाअंतर्गत विविध उड्डाणे, कार्गो फ्लाईट्स महाराष्ट्रात नियमितपणे ये-जा करत असतात. यामुळे महाराष्ट्रात विविध राज्यातून मोठ्या प्रमाणावर क्रु मेंबर्स दाखल होत असतात. (राजस्थान, गोवा, दिल्ली व गुजरात मधून महाराष्ट्रात येणार्यांसाठी आजपासून RT-PCR test बंधनकारक)
राज्य सरकारच्या गाईडलाईन्सनुसार, विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कोविड RT-PCR चाचणी निगेटीव्ह असणे अनिवार्य आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या तपासणीमध्ये अधिक कालावधी लागत असून उड्डाणांसाठी दिरंगाई होत आहे. ही समस्या टाळण्यासाठी सर्व विमानांचे केबिन क्रु आणि कॉकपीट क्रु यांना RT-PCR टेस्टमधून वगळण्यात आले आहे. यासाठी त्यांच्याकडे त्यांच्या एअरलाईन्सचे व्हॅलिट ओळखपत्र असणे गरजेचे आहे. हा नियम महाराष्ट्रातील सर्व विमानतळांना लागू करण्यात आला असून सर्व एअरलाईन्सना कोविड संबंधित नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या नियमावलीनुसार, महाराष्ट्रात विमानाने येणाऱ्या सर्व प्रवाशांची RT-PCR टेस्ट प्रवासाच्या 72 तास आधी होणे अनिवार्य आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद विमानतळावर या गोष्टीची पडताळणी केली जात आहे. राज्यामध्ये रस्ते मार्गे येणाऱ्या प्रवाशांसाठी तापमान तपासणे, कोरोनाची लक्षणे आहेत का ते तपासणे आणि राज्यात प्रवेश देण्यापूर्वी त्यांची चाचणी करुन घेणे गरजेचे आहे.