Railway Station | Photo Credits: ANI

भारतामध्ये कोरोनाची दुसरी लाट मोठं स्वरूप घेऊ नये म्हणून त्याला वेळीच रोखण्यासाठी आता प्रशासन सज्ज झालं आहे. दरम्यान आज (25 नोव्हेंबर) पासून दिल्ली, राजस्थान, गोवा,गुजरात मधून महाराष्ट्रात येणार्‍यांसाठी कडक नियमावली आहे. आता या राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणार्‍यांना त्यांचा कोविड चाचणीचा आरटी पीसीआर टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचा दाखला सादर करावा लागणार आहे. रस्ते, रेल्वे आणि विमान मार्गे या तिन्ही साठी हा नियम लागू असणार आहे. त्या अनुषंगाने विविध ठिकाणी नाकाबंदी वाढवत टेस्टिंगची चोख सेवा वाढवली आहे.

दरम्यान तुमच्याकडे कोविड चाचणीचा रिपोर्ट नसेल तर तुम्हांला स्वखर्चाने महाराष्ट्रात आल्यावर तो करावा लागणार आहे. तो निगेटिव्ह आला असेल तरच आतमध्ये राज्यांत परवानगी दिली जाईल. यासाठी स्क्रिनिंग सेंटर्स सुसज्ज ठेवण्यात आली आहेत. पोलिस, आरोग्य आणि महसूल विभागातून एक व्यक्ती अशा टीम काम करत आहेत.

ANI Tweet

मुंबई एअरपोर्ट वर RT-PCR test ही 1400 रूपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी काही खाजगी लॅब्सला त्यासाठी परवनागी देण्यात आली आहे. दरम्यान तुमच्याकडे असणारा अहवाल हा 96 तासांपेक्षा जुना नसावा. असे सांगण्यात आले आहे.

मागील काही दिवसांपासून दिल्लीमध्ये कोरोनाचा कहर सुरू आहे. मोठ्या प्रमाणात रूग्ण समोर येत आहेत तर मृत्यूंच्या संख्येमध्येही वाढ झाली आहे. दरम्यान गुजरातमध्येही रात्रीच्या वेळेस कर्फ्यू लागू करण्यात आले आहेत.