Corona Center Aurangabad: डॉक्टरची महिलेकडे शरीसुखाची मागणी, औरंगाबाद येथील कोविड सेंटरमधील घटना
Representational Image (Photo Credits: Pixabay)

कोरोना सेंटरमध्ये (Corona Center) आलेल्या महिलेकडे एका डॉक्टरकडूनच (Aurangabad Doctor) शरीरसुखाची मागणी झाल्याचा धक्कादायक प्रकार पुढे येत आहे. औरंगाबाद (Aurangabad) येथील शहर पदमपुरा कोरोना सेंटरमध्ये हा प्रकार घडल्याची माहिती आहे. या प्रकाराची माहिती महिलेच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांना समजल्यानंतर त्यांनी रुग्णालयात घुसुन डॉक्टरला बेदम मारहाण केली.

प्राप्त माहितीनुसार, डॉक्टरला पीडितेचा मोबाईल नंबर मिळाला होता. या नंबरच्या माध्यमातून तो पीडितेला दररोज फोन करत असे आणि त्रास देत असे. त्याने महिलेला सुट्टी देण्याबाबत चर्चा करण्याच्या नावाखाली पीडितेला केबीनमध्ये बोलावले. केबिनमधील एकांताचा फायदा घेत डॉक्टरने या महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली, असा आरोप आहे. (हेही वाचा, महाराष्ट्र सरकारच्या कर्मचाऱ्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा; सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्वाचा निर्णय)

दरम्यान, या प्रकरणाचे जोरदार पडसात उमटले आहेत. महानगरपालिका आयुक्त पांडे यांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून संबंधित डॉक्टरला पदापासूनही दूर करण्यात आले आहे. आतापर्यंत पीडितेने बदनामीच्या भीतीने पोलिसांत तक्रार देणे टाळले. मात्र, या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु आहे. या प्रकरणातील सत्यता पोलीस तपासातूनच पुढे येणार आहे.