प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

कोरोना विषाणूचा (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असताना अकोल्यातील (Akola) घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कोरोना विषाणूचा संशयित म्हणून अकोला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णाने आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास स्वत:चा गळा चिरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे आजूबाजुच्या परिसरात धक्कादायक वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित रुग्णाला मंगळवारी अकोल्यातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी मिळालेल्या चाचणी अहवालात हा रुग्ण कोरोनाबाधीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे हा रुग्ण नैराश्यात होता. यातूनच त्याने आत्महत्या केली, अशी माहिती समोर आली आहे.

मयत रुग्णाचे नाव मोहम्मद जहरुल इस्लाम असे असून तो मूळचा सालपडा जि. नागाव,आसाम येथील रहिवासी आहे. करोना संशयित म्हणून 7 एप्रिल रोजी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची पुढी तपासणी करण्यात आली होती. शुक्रवारी 10 एप्रिल रोजी मिळालेल्या चाचणी अहवालात हा रुग्ण कोरोनाबाधीत असल्याचे निष्पन्न झाले होते. यातून आज पहाटे 5 सुमारास मोहम्मद रक्तबंबाळ अवस्थेत बाथरूममध्ये आढळला. कर्मचाऱ्यांनी ही माहिती रुग्णालय प्रशासनाला दिली. त्यानंतर तातडीने त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, शस्त्रक्रिया सुरू असताना त्याचा मृत्यू झाला, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. या संदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहेत. कोरोना विषाणूमुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाल्या आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरू नये. तसेच या संकटाला सामोरे जा, असे आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना केले असतानाही काहीजण टोकाचे पाऊल उचलत आहेत. हे देखील वाचा- Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्र राज्यात कोरोना व्हायरसचे संकट अधिक तीव्र; 92 नव्या रुग्णांसह कोरोना बाधितांचा आकडा 1666 वर

जगभरात कोरोनाबाधीतांची संख्या 16 लाख 91 हजार 719 वर पोहचली आहे. यांपैकी 1 लाख 2 हजार 525 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 3 लाख 68 हजार 669 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतही आता कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकत चालला असल्याची चिन्ह दिसू लागली आहे. भारतात आतापर्यंत एकूण 7 हजार 447 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 239 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 643 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 1666 वर पोहचली आहे. यात 110 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 117 रुग्ण कोरोना विषाणूच्या जाळ्यातून बाहेर आल्याचे समजत आहे.