Coronavirus | Representational Image | (Photo Credits: IANS)

संपूर्ण जगाला जेरीस आणलेल्या कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रभाव देशासह महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या राज्यातील रुग्णसंख्येत आजही वाढ पाहायला मिळत आहे. राज्यात आजच्या दिवसात 92 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 1666 वर गेला आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. कोरोना व्हायरसमुळे ग्रस्त झालेल्यांची संख्या राज्यात वाढत असल्याने राज्य सरकारने विविध वैद्यकीय सुविधा नागरिकांसाठी सुरु केल्या आहेत. तसंच कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाचे रुग्ण आढळलेली ठिकाणे कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत. त्यामुळे या भागात नागरिकांना जाण्या-येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

विशेष म्हणजे भाजी मंडईत होणारी गर्दी लक्षात घेत ठाणे, पुणे, नवी मुंबई या शहरांमधील भाजीपाला, फळ बाजार 14 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. तसंच मीरारोड-भाईंदर येथील भाजी, फळ बाजार बंद राहणार आहे. मुंबईतील धारावी येथे कोरोनाचे रुग्ण आढळल्याने तेथे भाजी विक्री, फेरीवाले यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे दारोदारी जावून तेथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जाणार आहे.

ANI Tweet:

देशातील कोरोना बाधितांचा आकडा 7447 वर पोहचला आहे. तसंच यात सातत्याने होणारी वाढ पाहता राजस्थान, ओडिशा या राज्यांनी लॉकडाऊनचा कालावधी 30 एप्रिल पर्यंत वाढवला आहे. मात्र राज्यात कोरोनाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान आज देशातील सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत आहेत. त्यानंतर राज्यातील स्थिती बाबत स्पष्ट कल्पना येऊ शकेल, असा अंदाज आहे.