Coronavirus Update: भारतात पाठीमागील 24 तासात 9,195 जणांना कोरोना संसर्ग, Omicron रुग्णांची संख्या 781 वर पोहोचली
Coronavirus | (Photo Credit: Archived, edited, representative images)

भारतात पाठिमागील 24 तासात 9,195 जण कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित आढळले आहेत. ही संख्या आगोदरच्या संख्येच्या तुलनेत 44.6% अधिक आहे. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत (National Vaccination Campaign) आतापर्यंत 143.15 कोटी जनतेचे लसीकरण करण्यात आले आहे. मात्र, अद्यापही कोरोना लसीची एकही मात्रा न घेतलेल्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. दुसऱ्या बाजूला कोरोना लसीची दुसरी मात्रा न घेतलेल्यांचे प्रमाणही लक्षवेधी आहे. त्यामुंळे भारतातील कोरोना व्हायरस संक्रमितांची वाढती संख्या चिंताजनक आहे. त्यातच ओमायक्रोन (Omicron) हा कोरोनाचा नवा स्ट्रेनही डोकेदुखी वाढवत आहे.

भारतात आजघडीला कोरोनाचे 77,002 रुग्ण आहेत. कोरोना संक्रमितांचे उपचार घेऊन बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 98.40% आहे. पाठिमागील 24 तासात कोरोना संक्रमितांचे उपचार घेऊन बरे झालेल्यांचे प्रमाण 7,347 इतके आहे. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्यांचे प्रमाण वाढून ते 3,42,51,292 इतके झाले आहे. पाठिमागील 24 तासात 302 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या 4,80,592 इतकी झाली आहे. (हेही वाचा, Sangli: 32 विद्यार्थिनींना कोरोना व्हायरस संसर्ग; सांगली येथील मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील घटना)

दुसऱ्या बाजूला देशात Omicron Variant मोठ्या प्रमाणावर डोके वर काढतो आहे. आतापर्यंत देशभरात ओमायक्रोन संक्रमित 781 जणांची नोंद झाली आहे. त्यापैकी 241 जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत संपूर्ण भारतात 21 राज्यांमध्ये कोरोना व्हायरसचा हा नवा स्ट्रेन पसरला आहे. दिल्लीमध्ये ओमिक्रॉनचे सर्वाधिक 238 रुग्ण आहेत. तर महाराष्ट्रातही कोरोनाचे 167 रुग्ण आहेत. ओमायक्रोन संक्रमितांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.

दिल्लीत वाढत्या कोरोना संक्रमितांच्या आकड्यामुळे यलो अलर्ट लागू करण्यात आला आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन दिल्ली आपत्ती प्रतिबंध प्राधिकरण (DDMA) ने हा अलर्ट लागू केला आहे. या आदेशानुसार शाळा-महाविद्यालये, चित्रपटगृहे, व्यायामशाळा आणि सार्वजनिक हॉल बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, दुकाने आणि सरकारी वाहतुकीवरही मोठ्या प्रमाणावर प्रतिबंध लागू केले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रातही कोरोना व्हायरस संक्रमितांची वाढती संख्या विचारात घेऊन सरकारने रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत विविध सेवांवर निर्बंध घालण्यात आले आहेत.