राजेश टोपे (Photo Credits-ANI)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून त्याच्या रुग्णांचा आकडा 500 च्या पार गेला आहे. तसेच 50 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी मदत करणाऱ्या प्रत्यकाचे आभार मानले आहेत. देशभरात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर्स आणि अत्यावश्यक सेवासुविधांमधील कर्मचारी दिवसरात्र एक करुन काम करत आहेत. याच पार्श्वभुमीवर राजेश टोपे यांनी आपल्याकडे 1500 व्हेन्टिलेटर्स आणि महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयात सुद्धा व्हेन्टिलेटर्सची सोय करुन दिली जाणार असल्याचे म्हटले आहे.

राजेश टोपे यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 537 वर जाऊन पोहचल्याची माहिती दिली आहे. तसेच आपल्याकडे 25 हजार पीपीई ( Personal Protection Equipment), 25 लाख N95 मास्क, 25 लाख ट्रिपल लेअर मास्क असल्याचे सांगितले आहे. तसेच सरकारकडून राज्यातील रुग्णालयात 1500 व्हेन्टिलेटर्सची सोय आहे. मात्र ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत येणाऱ्या 2 हजारांपेक्षा अधिक रुग्णालयात सुद्धा लवकरच व्हेन्टिलेटर्सची अधिक उपलब्धता करुन दिली जाईल असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.(Coronavirus: कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना COVID-19 ची लागण झाल्याची बातमी खोटी, BMC ने दिले स्पष्टीकरण)

दरम्यान, महाराष्ट्रात खरोखरच आता संकटाचा काळ आहे देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहेत. अशावेळी नागरिकांना वारंवार घरी राहून लॉक डाऊनचे पालन करण्यास सांगितले जात आहे. जर का 15 एप्रिल पर्यंत ही परिस्थिती सुधारली नाही तर लॉक डाऊनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो असे संकेत आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.