चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने (Coronavirus) महाराष्ट्रासह (Maharashtra) संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्रात पहिला रुग्ण सापडल्यानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत गेली. देशभरामध्ये महाराष्ट्रातच कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले. एवढेच नव्हेतर, राज्यात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्युची नोंद झाली आहे. मात्र, राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून हैदोस घालणारा कोरोना आता अटोक्यात येत आहे. यातच यातच महाराष्ट्रातील दोन मोठी शहर नागपूर (Nagpur) आणि नाशिक (Nashik) शहरांनी कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. यामुळे वर्षभरापासून कोरोनाच्या धास्तीत असलेल्या नागपूर आणि नाशिककरांना मोठा दिलासा मिळत आहे.
नागपूरमध्ये जुलै महिन्यानंतर शुक्रवारी (29 जानेवारी) एकाही मृत्युची नोंद झाली नाही. शहरात गेल्या 24 तासात 325 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, 292 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या नागपूर येथील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 33 हजार 670 वर पोहचली आहे. यांपैकी 4 हजार 150 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 94.42 टक्क्यांवर पोहोचले आहे.
दुसरीकडे नाशिक येथे कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट होताना दिसत आहे. यामुळे नाशिक येथील मेरी, समाजकल्याण पाठोपाठ आता जिल्ह्यातील जम्बो कोव्हिड सेंटरही बंद झाले आहेत. एवढेच नव्हेतर, 325 खाटांच्या ठक्कर डोम कोव्हिड सेंटरला महापालिकेने टाळे ठोकले आहे. या आकडेवारीनुसार लवकरच नागपूर आणि नाशिक हे दोन्ही शहर कोरोनामुक्त होणार, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हे देखील वाचा- Maharashtra Bird Flu Update: 8 जानेवारी पासून आजपर्यंत एकूण 19,406 विविध पक्षांच्या मृत्यूची नोंद; आतापर्यंत बाधित क्षेत्रामधून 71,773 कुक्कुट पक्षी, 44,016 अंडी नष्ट
महाराष्ट्रात शुक्रवारी 2 हजार 771 कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तर, 2 हजार 613 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 19 लाख 25 हजार 800 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या एकूण 43 हजार 147 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.28% झाले आहे.