Coronavirus (Photo Credits: AFP)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणू (Corona Virus) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. नुकतेच महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरीतील (Ratnagiri) एका 50 वर्षीय व्यक्तीची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ही व्यक्ती दुबईहून प्रवास करून आली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील हे पहिलेच प्रकरण आहे. या प्रकरणासह महाराष्ट्रात एकूण सकारात्मक रुग्णांची संख्या 45 वर पोहोचली आहे. आज रत्नागिरीतील या नवीन घटनेसह महाराष्ट्रात मुंबईत 1 आणि पुण्यात 2 रुग्ण आढळले आहेत. सध्या महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे 45 रुग्ण आहेत.

सध्या राज्यात विविध ठिकाणी अनेक लोकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता आज राज्य सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले. मुंबईतील महत्वाच्या 50 टक्के रस्त्यांवरील दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एकदिवसाआड लॉकडाऊन केले जाणार आहे. गर्दीच्या ठिकाणांवरील शॉपिंग सेंटर्स, मार्केट बंद राहणार असल्याची माहितीही देण्यात आली आहेत. तसेच कंपन्यांमध्ये प्रत्येक दिवशी फक्त 50 टक्केच कर्मचारी कार्यरत असणार आहेत.

कोरोना विषाणूची वाढती प्रकरणे पाहता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये हे महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

घेतलेले निर्णय -

> राज्यातील शासकीय कार्यालये एक दिवसाआड पद्धतीने रोज 50 टक्के कर्मचारी कम करतील.

> रेल्वे, एसटी बसेस, मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही 50 टक्के प्रवाशी क्षमतेने चालवली जाईल.

> शहरातील सर्व दुकाने काही काळाच्या अंतरा अंतराने सुरु राहतील

> महत्वाच्या रस्त्यावरील दुकाने एक आड एक दिवस 50 टक्के बंद राहतील.

> दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये या ठिकाणी सर्व प्रकारची साधनसामुग्री उपलब्ध राहील हे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

मुंबईमध्ये बेस्टने प्रवास करणारे अनेक प्रवासी आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी बेस्टमध्ये उभे राहणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी केली जाणार आहे. तसेच प्रवाशांना अंतर सोडून बसण्याच्या सूचनाही देण्यात येणार आहेत.