सरकार गंभीर असेल तर जनता गंभीर होईल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांचा टोला
Sanjay Raut | (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता धोका लक्षात घेता देशातील अनेक राज्य लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आली आहेत. मात्र लॉकडाऊनचा हा निर्णय जनता गंभीरतेने घेत नसल्याचे दिसून आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ट्विट करुन लॉकडाऊन आतापासूनच गंभीरपणे घ्या, असे नागरिकांना सूचित केले. मोदींनी केलेल्या या ट्विटचा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करत चांगलाच समाचार घेतला आहे. सरकार गंभीर असेल तर जनता गंभीर असेल, अशा शब्दांत त्यांनी मोदींना टोला लगावला आहे.

संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले की, "लॉकडाऊन कोणी गंभीरतेने घेत नसल्याने आमचे पंतप्रधान चिंतेत आहेत. पण प्रिय पंतप्रधान, तुम्हीच भीती आणि चिंतेच्या वातावरणात सण, उत्सवासारखी परिस्थिती निर्माण केलीत. सरकार गंभीर असेल तर जनता गंभीर होईल." (लॉकडाउनची परिस्थिती नागरिकांनी गांभीर्याने घेण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नागरिकांना आवाहन)

संजय राऊत यांचे ट्विट:

कोरोना व्हायरसच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर काल देशात जनता कर्फ्यू पाळण्यात आला. कर्फ्यूला देशभरातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. मात्र मोदींच्या आवाहनानुसार संध्याकाळी 5 वाजता सर्व नागरिकांनी घराबाहेर येऊन टाळ्या, घंटा, शंख नाद केला. त्यामुळे काही ठिकाणी गर्दी जमली. सेलिब्रेशनचे वातावरण निर्माण झाले. कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू नये म्हणून गर्दी टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र मोदींच्या आवाहनामुळे त्याच्या विपरीत परिस्थिती निर्माण झाली. यामुळे संजय राऊत यांनी ट्विटद्वारे मोदींना टोला लगावला आहे.