Mumbai Police | Photo Credits: Twitter

कोरोना व्हायरसचं विनाशी संकट थोपवण्यासाठी पंतप्रधान नारेंद्र मोदी यांनी 25 मार्चपासून पुढील 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. दरम्यान या काळात नागरिकांनी घरामध्येच राहणं सुरक्षित आहे. असे वारंवार आवाहन केलं आहे. मात्र जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी किंवा महत्त्वाच्या काही कामांसाठी अनेकजण रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. दरम्यान बाहेर पडलात तरी सोशल डिस्ट्न्सिंग पाळा असे कडक आदेश देण्यात आले आहेत. मात्र तरीही अनेक लोक रस्त्यांवर झुंबड करताना दिसत असल्याने आता मुंबई पोलिसांनी नागरिकांना भावनिक साद घालत पुढील 2 आठवडे घरी बसा आणि कोरोनाचं संकट रोखायला मदत करा असे कळकळीचं आवाहन केलं आहे. Lockdown: संचारबंदीत वाहनांची वाहतूक करणाऱ्या नागरिकांची मुंबई पोलिसांकडून कसून चौकशी

सामान्य नागरिक जर कमीत कमी बाहेर पडले तर आपोआपचं कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा विळखा तोडायला मदत होणार आहे. सोबतच सरकारी यंत्रणेवरील ताण कमी होईल. त्यामुळे पोलिस कर्मचार्‍यांनी खास व्हिडिओच्या माध्यमातून नागरिकांना घरीच रहा आणि सुरक्षित रहा असं आवाहन केले आहे. यामध्ये प्रत्येक पोलिस कर्मचार्‍याच्या हातामध्ये खास मेसेजचा एक बोर्ड दिला आहे. यामध्ये 'माझी 3 वर्षाची मुलगी आहे.' , 'माझी आई घरी आजारी आहे', 'माझी बायको माझ्या काळजीत आहे' 'पण आम्ही घरी जाऊ शकत नाही' कारण आम्ही तुमच्या सेवेत आहोत असा मेसेज विविध कर्मचार्‍यांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे पंतप्रधानांपासून राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री ते आता थेट पोलिस कर्मी नागरिकांना घरीच बसण्याचं कळकळीचं आवाहन करत आहेत.

मुंबई पोलिस ट्वीट

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 200 च्या पार गेला आहे. दरम्यान त्यापैकी 9 जणांचा मृत्यू झाला आहे. देशामध्येही आता कोरोनाबाधितांनी 1000 चा टप्पा पार केल्याने नागरिकांमध्ये आता कोरोना व्हायरसचा संसर्ग झपाट्याने पसरू नये म्हणून खास घरातच राहण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र मोफत धान्य वाटपाच्या अफवेने, भाजीपाला, फळं मिळतील की नाही या भीतीने नागरिक खरेदीसाठी झुंबड करत आहे. अशावेळेस नाईलाजास्तव पोलिसांना कारवाईचा बडगा उचलावा लागत आहे.