महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) उद्रेक अगदी तीव्र स्वरूपात पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या रुग्णांनी जवळपास 200 चा टप्पा गाठला आहे. मात्र अद्याप सुदैवाने राज्य कोरोनाच्या फैलावाच्या दुसऱ्याच टप्प्यात आहे, सामुदायिक कोरोना प्रसाराच्या म्हणजेच कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात राज्य जाऊ नये यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एक खास आवाहन नागरिकांना केले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने घरी राहण्याचा दृढनिश्चय बाळगणे आवश्यक आहे. जर का आपण दृढनिश्चय बाळगलात आणि घराबाहेर पडला नाहीत तर कोरोना रोखण्यासाठी मोठी मदत होईल आणि परिणामी आपण अजूनही राज्य वाचवू शकाल असे अजित पवार यांनी म्हंटले आहे. राज्यात लॉक डाऊन (Lock Down) असतानाही बेजबाबदार पणे घराबाहेर पडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असाही इशारा अजित पवार यांनी दिला आहे.
प्राप्त माहितीनुसार, अजित पवार यांनी नागरिकांना आवाहन करताना घरातंच थांबून योग्य काळजी घ्या, खरेदीची गर्दी टाळा , विलगीकरण केलेल्या संशयित रुग्णांनी सूचनांचे पालन करा, असे केल्यास आपण निश्चितपणे ‘कोरोना’ला रोखू शकतो. राज्यातल्या प्रत्येकाने यासाठी किमान दोन आठवडे घराबाहेर न पडण्याचा संकल्प करुया, असं सांगितले आहे. Coronavirus: कोरोना व्हायरस संदर्भातील शंका दूर करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे व्हॉट्सअॅप नंबर जारी; BMC ने ट्विट करून दिली माहिती
दरम्यान, सद्य घडीला राज्यातील आकडेवारी पाहता मुंबई - 85 ,पुणे - 37, सांगली- 25 , ठाणे - 23 , नागपूर - 14, यवतमाळ - 4 , अहमदनगर - 5 , सातारा - 2 , औरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गोंदिया, जळगाव, बुलडाणा प्रत्येकी - 1 असे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांवर सध्या दिवसरात्र उपचार सुरु आहेत. तर आज बुलढाण्यातील 45 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह होता. आतापर्यंत राज्यात कोरोनाने 8 बळी घेतले आहेत.