महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोरोना व्हायरस संकटाचा सामना करण्यासाठी आता केंद्र सरकारकडे आर्थिक मदत मागितली आहे. त्यांनी 25 हजार कोटी रूपयांचे विशेष पॅकेज मंजुर करावं अशी मागणी करणारं एक पत्र केंद्राला पाठवलं असल्याची देखील माहिती दिली आहे. दरम्यान केंद्र सरकारमधील राज्याचे प्रभारी मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) , प्रकाश जावडेकर (Prakash Javdekar) यांच्यासोबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांना पत्र लिहून याबाबत मदत मागितली असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान मागील काही महिन्यांपासून केंद्राकडून महाराष्ट्र राज्याला येणे असलेली 16 हजार 654 कोटींची थकबाकी अजुनही मिळालेली नाही. त्याची देखील 31 मार्चपर्यंत पूर्तता व्हावी अशी आग्रही मागणी अजित पवार यांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे. Coronavirus Update: महाराष्ट्रात आणखी 5 नवे रुग्ण आढळले; राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 230 वर.
सध्या देशामध्ये कोरोना व्हायरसचं संकट घोंघावत असल्याने लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे मुंबई सह राज्यातील अनेक उद्योगधंदे बंद आहेत. त्यामुळे राज्याच्या उत्पन्नात घट झाली आहे. समोर असलेलं कोरोना संकट रोखण्यासाठी मोठा निधी आवश्यक आहे अशी मागणी त्यांनी केली आहे. केंद्र सरकारनं देशात तीन आठवड्यांचे लॉकडाऊन जाहीर केल्याने उद्योग,व्यापार,सेवा क्षेत्र ठप्प आहे. आर्थिक वर्षाच्या अखेरच्या महिन्यात राज्याच्या उत्पन्नात मोठी भर पडते परंतु,कोरोना आणि लॉकडाऊनमुळे यंदा उत्पन्न थांबले आहे. राज्यासमोर गंभीर आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे. अशाप्रकारचे ट्वीट देखील अजित पवार यांनी केलं आहे.
अजित पवार यांची मागणी
तसंच ‘कोरोना’च्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी २५ हजार कोटींचे विशेष पॅकेज महाराष्ट्राला मंजूर करावं, यासंबंधीचं पत्र अर्थमंत्री @nsitharaman जी तसंच राज्याचे केंद्रातले प्रभारी मंत्री @nitin_gadkari जी, @PrakashJavdekar जी यांना पाठवलं आहे.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 30, 2020
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 230 पर्यंत पोहचला आहे. यामध्ये मुंबई, सांगली, पुणे, यवतमाळ, बुलढाणा, नागपुर सह कोकणातही कोरोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे त्यांच्या उपचारासाठी स्थानिक सरकारी रूग्णालयांमध्ये आरोग्य यंत्रणा राबवली जात आहे.