Coronavirus: नागपूर येथे कोरोना व्हायरसचे 59 पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची क्लिप सोशल मीडियात व्हायरल करणाऱ्या तिघांना अटक
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून त्याचा रुग्णांच्या संख्येत अधिक वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र काही समाजकंटक हे सोशल मीडियात कोरोना व्हायरस संबंधित खोटी माहिती देत असल्याचे प्रकार सुद्धा उघडकीस आले आहेत. तर नागपूर येथे 59 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती देणारी एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियात पसवरण्यात आली होती. पण व्हायरल करण्यात आलेली ऑडिओ क्लिप ही खोटी असून या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

नागपूर शहराचे पोलीस आयुक्त बीके उपाध्याया यांनी कोरोना संदर्भात खोटी ऑडिओ व्हायरल केली जात असल्याची माहिती दिली आहे. ही खोटी ऑडिओ पसरवणाऱ्या तिघांचे कनेक्शन यामध्ये असल्याचे दिसून आल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच या 59 लोकांपैकी 3 जण डॉक्टर्स असल्याचे ही ऑडिओ क्लिपमध्ये सांगण्यात आले होते. तर नागपूर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये व्हायरल करण्यात आलेल्या क्लिपमधील माहिती खोटी असल्याचं सांगत अफवांचे खंडन केले. दरम्यान नागपुरात 4 कोरोनाबाधित असून त्यांची स्थिती उत्तम असल्याचं सांगण्यात आले आहे.(Fact Check: नागपूर शहरात 59 नव्या कोरोनाबाधितांमध्ये 3 डॉक्टरांचा समावेश अशी सोशल मीडीयात फिरणारी ऑडिओ क्लिप खोटी; PIB in Maharashtra ने केला खुलासा)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना कोरोना व्हायरस पासून स्वतःला वाचवायचं असेल तर घरीच रहा. कोरोनाशी सामना करायला सरकार सज्ज आहे. नागरिकांनी अनावश्यक गर्दी करून सरकारी यंत्रणेवरील ताण वाढवू नये असे आवाहन केलं आहे. दरम्यान आता नागपूर शहरामध्ये वस्तींमध्ये जाऊन होम क्वारंटाईनचा सल्ला दिलेल्यांची विचारपूस, तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.