Screening of dharavi people (Photo Credits-ANI)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 1666 वर जाऊन पोहचला आहे. तर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून संवाद साधताना कोरोना संबंधित लॉकडाउनचे आदेश आणखी काही काळ वाढावावेत असा प्रस्ताव मांडला आहे. तसेच ज्या परिसरात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत तेथील परिसर सील करण्यात आले आहेत. याच पार्श्वभुमीवर धारावीत (Dharavi) सुद्धा कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने हा परिसर सील केला आहे. तर आजापासून 150 डॉक्टरांच्या पथकाकडून धारावीतील नागरिकांची स्क्रिनिंगच्या माध्यमातून तपासणी करण्यास सुरुवात झाली आहे.

धारावीत आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे जणांना बळी गेला आहे. तर रुग्णांची संख्या 20 पेक्षा अधिक झाली आहे. धारावीत दाटीवाटीने नागरिक राहत असल्याने तेथे सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करणे थोडे मुश्किलच आहे. मात्र या परिसरात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अत्यावश्यक काळजी घेतली जात आहे. तर महापालिकेने शुक्रवारी धारावी येथील शौचालयांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण केले आहे. तर आता महापालिकेच्या मदतीसाठी 150 डॉक्टरांचे पथक धारावीतील नागरिकांची स्क्रिनिंगद्वारे चाचणी करत आहेत. (मुंबई: धारावीतील कंटेनमेंट, बफर झोन मध्ये भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फेरीवाल्यांना बंदी; कोरोना व्हायरसचा धोका आटोक्यात ठेवण्यासाठी BMC चे आदेश)

दरम्यान,धारावीत नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिस अधिकारी कोरोनाच्या विळख्यात अडकू नयेत म्हणून खास सॅनिटायझेशन टेंट उभारण्यात आली आहे. स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांनी धारावी पोलिसांसाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही सोय केली आहे. तर राहुल शेवाळे स्वतः धारावीमध्ये पाहणीसाठी आले होते. ही खास सॅनिटायझेशन टेन्ट धारावी पोलिस स्टेशनच्या बाहेर उभारण्यात आले आहे.