Dharavi | Photo Credits: Twitter/ ANI

कोरोना व्हायरसचं सध्या मुंबई शहरामधील प्रमुख हॉटस्पॉटपैकी एक ठिकाणं म्हणजे धारावी आहे. धारावीत दिवसागणिक वाढणारी रूग्ण संख्या पाहता आता प्रशासनाने धारावी भागामध्ये कोरोनाचा बिमोड करण्यासाठी कठोर पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. आता धारावीतील प्रत्येकाचं स्क्रिनिंग होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान या परिस्थितीमध्ये धारावीत नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिस अधिकारी कोरोनाच्या विळख्यात अडकू नयेत म्हणून खास सॅनिटायझेशन टेंट उभारण्यात आली आहे. स्थानिक खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांनी धारावी पोलिसांसाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही सोय केली आहे. आज राहुल शेवाळे  स्वतः धारावीमध्ये पाहणीसाठी आले होते. ही खास सॅनिटायझेशन टेन्ट धारावी पोलिस स्टेशनच्या बाहेर उभारण्यात आली आहे.

महाराष्ट्रात कोरोना रूग्णांचा आकदा 1300 पार गेला आहे. त्यामध्येही निम्मे रूग्ण मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आढळत असल्याने आता मुंबईतील कोरोना पसरल्यास धोकादायक ठरू शकतात असे भाग सील करण्यास सुरूवात झाली आहे. धारावी हा अतिशय दाटीवाटीचा भाग असून झोपडपट्टीच्या या भागामध्ये एकाच घरात 10-12 जण राहिल्यास सोशल डिस्टन्सिंग पाळणं शक्य नाही. त्यामुळे आता धारावीत कोरोना व्हायरस रोखण्यासाठी राज्य सरकार,बीएमसी खास प्लॅन बनवत आहे.

ANI Tweet

धारावीमध्ये पहिला कोरोनाबाधित रूग्ण 1 एप्रिलला सापडला होता. त्यानंतर झपाट्याने या भागात नवे रूग्ण आढळत आहेत. धारावीत आज 5 नवे रुग्ण सापडले असून या परिसरात एकूण 22 रुग्ण आढळले आहेत. काल पालिका प्रशासनाने धारावीमध्ये बफर झोन तसेच कंटेन्मेंट झोनमधील भागात भाजीविक्रेते, फळ विक्रेते तसेच फेरीवाल्यांना पूर्ण बंदी घातली आहे.