Railways | Representational Image | (Photo Credits: ANI)

मुंबई (Mumbai) शहरावर असलेल्या कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी शहराची वाहीनी अशी ओळख असलेली मुबई लोकल ( Mumbai Local) बंद करावी असा विचार व्यक्त केला जात आहे. हा विचार व्यक्त होत असतानाच केंद्र सरकारने मुंबई शहर आणि देशभरातील सुमारे 250 रेल्वेस्टेशनवरचे प्लॅटफॉर्म तिकीट दर ( Mumbai Local Platform Ticket Prices) वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. प्राप्त माहितीनुसार, आगोदर प्रति तिकीट 10 रुपये इतके असलेले दर आता थेट प्रति तिकीट 50 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई रेल्वेच्या मध्य, हार्बर, पश्चिम आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील कार्यालयांना या निर्णयाचे आदेशपत्र मिळाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेण्याच्या हेतूने हे तिकीट दर वाढविण्यात आले आहेत. तिकीट दर अधिक केल्यामुळे नागरिकांना ते अधिक वाटतील. तसेच, त्यामुळे ते तिकीट काढून फलाटावर गर्दी करण्याचे प्रमाण कमी होईल, असा या निर्णयाचा उद्देश असल्याचे प्रसारमाध्यमांनी रेल्वे अधिकाऱ्यांच्या हवाल्याने वृत्त देत म्हटले आहे. तसेच, ज्या प्रवाशांकडे फलाट तिकीट नसते ते नियमबाह्य प्रवास करणारे प्रवासी म्हणूण ओळखले जातात. त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल, असेही या वृत्तात म्हटले आहे.

रेल्वे अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितले की, मार्च 2015 मध्ये रेल्वे मंत्रालयाने एका आदेशानुसार विशिष्ट परिस्थितीत आवश्यकता वाटल्यास तसेच, गर्दी नियंत्रित करण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट दर 10 रुपयांपेक्षा अधिक करण्याचे अधिकार विभागीय रेल्वे संचालक (डीआरएमएस) यांना दिले आहेत. (हेही वाचा, Coronavirus च्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकल, मेट्रो, मोनोरेल होणार बंद? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय)

दरम्यान, मुंबई, वडोदरा, अहमदाबाद, रतलाम, राजकोट आणि भावनगर येथील रेल्वे स्टेशन्सवर प्लॅटफॉर्म तिकीट दर वाढविण्यात आले आहेत. राष्ट्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील COVID-19 संक्रमीत रुग्णांची संख्या 126 इतकी झाली आहे. हिच संख्या काल 114 इतकी होती.