Coronavirus: मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्याला कोरोना व्हायरसची लागण
Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रासह देशभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याच्या सुचना वारंवार दिल्या जात आहेत. तसेच विनाकारण रस्त्यावर फिरु नका असे ही आवाहन पोलीस आणि सरकारकडून देण्यात येत आहे. लॉकडाउनच्या काळात फक्त अत्यावश्यक सेवासुविधा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर विविध ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याची माहिती समोर येत आहे. याच पार्श्वभुमीवर मुंबईत एका बेस्ट कर्मचाऱ्याला (BEST Employee) कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

कोरोनाची लागण झालेला व्यक्ती हा मुंबईतील असून तो इलेक्ट्रिसिटी पुरवणाऱ्या विभागात काम करतो. सदर व्यक्ती 21मार्चला तारखेला कामावर गेला होता. या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे कळताच त्याला 26 मार्चला एसआरव्ही रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच महापालिकेने त्याच्या सोबतच्या अन्य कर्मचाऱ्यांना 14 दिवस सेल्फ क्वारंटाइनचा सल्ला दिला आहे. तसेच गेल्या 28 दिवसात कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची यादी महापालिकेकडून तयार करण्यात येत आहे.(Lockdown in Mumbai: गोवंडीत घरी जाण्यास सांगितले असता टोळक्याकडून पोलिसांना शिवीगाळ करत मारहाण) 

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 300 च्या पार गेला असून 10 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे नागरिकांशी व्हिडिओच्या माध्यमातून बातचीत करत कोरोनासंबंधित अधिक माहिती देतात. तसेच पोलीस कर्मचारी, डॉक्टर्स, नर्स किंवा अन्य वैद्यकिय कर्मचारी कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी दिवसरात्र काम करत आहेत. परंतु आता कोरोनाच्या पार्श्वभुमीवर बेजबाबदारपणे वागणाऱ्यांच्या आणि नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही असा इशारा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारयांनी नागरिकांना दिला आहे.