महाराष्ट्रासह देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून त्याच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ही एक गंभीर बाब असून नागरिकांना वारंवार घरात बसण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तरीही काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडून रस्त्यावर फिरत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी आता पोलिसांना अशा बेजबाबदार लोकांच्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे. तर आतापर्यंत विविध राज्यातील बहुतांश जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पण काही जण मनमानी करत पोलिसांना मारहाण केल्याचे प्रकार यापूर्वी समोर आले आहेत. त्यात आता अजून एक भर पडली असून गोवंडी येथे घरी जाण्यास सांगितले असता टोळक्याकडून पोलिसांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
मुंबईत संचारबंदी असली तरीही नागरिक रस्त्यावर फिरत आहेत. त्यामुळे पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. तर गोवंडी येथे शिवाजी नगर परिसरात काही जण फिरत होते. त्यामुळे या लोकांना पोलिसांनी घरी जाण्यास सांगितले असता त्यांनी संताप व्यक्त करत पोलिसांना शिवीगाळ करत बांबूने मारहाण केली आहे. या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य जणांचा शोध घेतला जात आहे.(जे घरात थांबणार नाहीत, ते काही दिवसांनी हॉस्पिटलमध्ये दिसतील- अजित पवार)
दरम्यान, पोलीस कर्मचारी, डॉक्टर्स, नर्स किंवा अन्य वैद्यकिय कर्मचारी कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी दिवसरात्र काम करत आहेत. परंतु आता कोरोनाच्या पार्श्वभुमीवर बेजबाबदारपणे वागणाऱ्यांच्या आणि नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही असा इशारा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारयांनी नागरिकांना दिला आहे. तसेच कोरोनापासून स्वत:ला वाचवायचे असेल तर 'होम क्वारंटाईन' अथवा 'हॉस्पिटल क्वारंटाईन' असे दोनच पर्याय उपलब्ध आहेत, त्यामुळे स्वत:चे आणि स्वत:च्या कुटूंबाचे संरक्षण करायचे असेल तर घरात बसा असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.