Home Quarantine (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. तर दिवसागणिक कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने ही एक गंभीर बाब आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करायचा असेल तर घरीच थांबा असे वारंवार आवाहन नागरिकांना केले जात आहे. तरीही नागरिक लॉकडाउनच्या आदेशाचे उल्लंघन करत आहेत. तर काही ठिकाणी सकाळच्या वेळेस भाजीपाला खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून आली. दुसऱ्या बाजूला कोरोनाबाधितांवर दिवसरात्र डॉक्टर्स, नर्स आणि अन्य वैद्यकिय कर्मचारी उपचार करत आहेत. क्वारंटाइन करण्यात आलेल्या रुग्णांना 14 दिवसानंतर प्रकृती पाहून डिस्चार्ज दिला जातो. त्यानंतर ही या रुग्णांना घरीच थांबण्याचे सांगितले जाते. तर ज्या लोकांच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का आहे त्यांनी ही काटेकोरपणे नियमाचे पालन करणे अत्यावश्यक आहे. मात्र या नियमाचे उल्लंघन केल्याने महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 35 हजार गुन्हे दाखल झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.(Coronavirus Lockdown काळात रेशनिंग संदर्भात माहिती मिळवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला हेल्पलाईन नंबर, ईमेल, वेबसाईट; मुंबई, ठाणे शहरांसाठी विशेष नंबरची सोय)

 राज्यातील ज्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत त्यांनी घाबरुन न जाता त्यासंदर्भात चाचणी करावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच क्वारंटाइनचा शिक्का हातावर असल्यास अशा रुग्णांनी घराबाहेर पडणे टाळावे अशा सुचना ही देण्यात आल्या आहेत. तरीही नागरिकांकडून प्रतिबंधात्मक आणि क्वारंटाइनच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आता अशा लोकांच्या विरोधात पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.(Coronavirus Outbreak in Maharashtra: मुंबई, पुणे, रायगड यांसह राज्यातील विविध भागात कोरोनाचे 134 नवे रुग्ण; महाराष्ट्र राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1895)

दरम्यान, काही दिवसांपूर्वी उस्मानाबाद येथे अंत्यविधीसाठी गेलेले काही नागरिक पुण्याच्या मार्गाने मुंबईत येत होते. या लोकांच्या हातावर क्वारंटाइनचा शिक्का असून एकाच गाडीत 15 जण कोंबून बसल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या 4 महिलांना कोरोनाची चाचणी करण्यासाठी सांगण्यात आले होते. मात्र या महिलांनी मुंबई सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.