कोरोना व्हायरसची वाढती साखळी तोडण्यासाठी घेण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सध्या तिसरा टप्पा सुरु आहे. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्पाचा कालावधी संपण्यासाठी केवळ 10 दिवस बाकी आहेत. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यात यश आले असले तरी काही ठिकाणी कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोना हॉटस्पॉट मधील लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जावू शकतो, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. देशातील कोरोना बाधितांचा आकडा 56 हजारावर गेला असून याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्र राज्याला बसला आहे. महाराष्ट्रात एकूण 17 हजाराहून अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. त्यापैकी मुंबई, ठाणे, पुणे शहारात सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी लॉकडाऊनचा कालावधी वाढू शकतो, अशी माहिती समोर येत आहे. (महाराष्ट्रात कोरोना संक्रमितांची काय आहे जिल्हानिहाय आकडेवारी, आजचे ताजे अपडेट एका क्लिकवर)
लॉकडाऊन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही असे महाराष्ट्र मुख्यमंत्री ऑफिसच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी ANI शी बोलताना सांगितले. पुढे ते म्हणाले की, "लॉकडाऊनचा कालावधी संपण्यासाठी 10 दिवस बाकी आहेत. त्यामुळे लॉकडाऊन वाढेल याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, अद्याप याबद्दल काही ठोस सांगता येणार नाही."
ANI Tweet:
Some hotspots in Maharashtra could see lockdown extension
Read @ANI story | https://t.co/rFaQrjSJrV pic.twitter.com/MTirfsonOo
— ANI Digital (@ani_digital) May 8, 2020
दरम्यान काल मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांना विविध सूचना केल्या. तसंच या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले की, "सध्याच्या लॉकडाऊनमुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यात आपण यशस्वी झालो आहोत. परंतु, मे महिन्याच्या अखेरपर्यंत जागरुक राहावे लागणार आहे. तसंच संपूर्ण महाराष्ट्राला मे महिन्याच्या अखेर पर्यंत ग्रीन झोन बनवण्याचा राज्य सरकारचा उद्देश आहे."
कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी 24 मार्चपासून देशव्यापी लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. त्यानंतर हा कालावधी 19 दिवसांनी वाढवत 3 मे करण्यात आला. परंतु, 3 मे नंतर पुन्हा लॉकडाऊन दोन आठवड्यांनी वाढवण्यात आला. मात्र झोननुसार, सेवा-सुविधांमध्ये काही सवलती देण्यात आल्या आहेत. त्यामुळे 17 मे नंतर रेड झोनबाबत राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.