देशातील विविध देवस्थान ट्रस्ट (Religious Trusts) कडे पडून असलेलं सोनं केंद्र सरकारने तातडीने ताब्यात घ्यावे. हे सोनं घेताना 1 किंवा 2 टक्के व्याजदरानं परतीच्या बोलीवर घ्यावं, अशी सूचनात्मक मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केली आहे. या आधी पृथ्वीराज चव्हाण यांनी देशाच्या एकूण जीडीपीच्या 10% इतके म्हणजेच किमान 21 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी केली होती. विशेष म्हणजे त्यानंतर केंद्रातील मोदी सरकारने कोरोना व्हायरस संकट निवारण आणि अडचणीत आलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी 20 लाख कोटी पॅकेजची घोषणा केली आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी @PMOIndia या पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर हँडलला टॅग करत एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये चव्हाण यांनी म्हटले आहे की, सरकारने ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे. WorldGoldConcil च्या अंदाजानुसार देशात १ ट्रिलियन डॉलर (किंवा ७६ लाख कोटी रुपये) इतके सोने आहे. सरकारने हे सोने १ किंवा २ टक्के व्याजाने परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावे. (हेही वाचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जर संपूर्ण माहिती द्यायची नसेल तर लाईव्ह येऊन देशाला संभ्रमात का टाकतात? प्रकाश आंबेडकर यांची 20 लाख कोटींच्या पॅकेजवर टीका)
पृथ्वीराज चव्हाण ट्विट
#Stimulus @PMOIndia सरकारने ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे. #WorldGoldConcil च्या अंदाजानुसार देशात १ ट्रिलियन डॉलर (किंवा ७६ लाख कोटी रुपये) इतके सोने आहे. सरकारने हे सोने १ किंवा २ टक्के व्याजाने परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावे.
— Prithviraj Chavan (@prithvrj) May 13, 2020
कोरोना व्हायरस संकट आणि त्यासाठी घेण्यात आलेला लॉकडाऊन आदी कारणामुळे केवळ राज्यच नव्हे तर भारतासह जगभरातील अनेक देशांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे जगभरातील देशांची सरकारं आपापल्या देशातील जनतेला आर्थिक पॅकेजद्वारे मदत करत आहेत. भारत सरकारनेही जगभरातील विविध देशांप्रमाणे पाऊल टाकत जनतेला आणि उद्योग विश्वाला विशेष पॅकेज देण्याची घोषणा केली आहे.