मुंबई (Mumbai) शहरातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाचे वाढते प्रमाण बरेचसे कमी झाले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेचे देशभरात कौतुक होते आहे. त्यामुळे मुंबईकरांनी नक्कीच काहीसा दिलासादायक श्वास घ्यायला सुरुवात केली आहे. असे असले तरी सर्वच काही अलबेल झाले असे नव्हे. मुंबईतील कोरोना संसर्गाचे घटते प्रमाण दिलासादायक असले तरी, वाढता मृत्यूदर चिंताजनक ठरतो आहे. त्यामुळे मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation), राज्य सरकार आणि प्रशासनाला यापुढे कोरोना संक्रमण नियंत्रणात ठेवण्यासोबतच मृत्यूदर कमी करण्यावरही भर द्यावा लागणार आहे.
आकडेवारीवर नजर टाकता 14 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान हा मृत्युदर 0.6% होता. तो 21 एप्रिल ते 27 एप्रिल दरम्यान 1.14% इतका झाला. पुढे 28 एप्रिल ते 4 मे दरम्यान मृत्युदर 2.17% तर 5 मे ते 11 मे दरम्यान हाच मृत्यूदर 2.27% इतका वाढला. मुंबईतील सरासरी मृत्यूदर 2.03% इतका आहे. महाराष्ट्रातील एकूण मृत्यूदराबाबत बोलायचे तर तो 1.48% इतका आहे. 15 एप्रिलदरम्यान, महाराष्ट्रातील पॉसिटिव्हिटी रेट 15.8% इतका होता. त्याच वेळी मुंबईचा पॉसिटिव्हिटी रेट 5.53% होता. (वाचा - Bharat Biotech च्या Covaxin ला 2-18 वयोगटातील मुलांवर चाचणी करण्यास DCGI ची परवानगी)
प्राप्त माहितीनुसार, आजघडीला महाराष्ट्रातील पॉझिटीव्हीटी रेट हा 17.36% इतका आहे. मुंबईचा पॉझिटीव्हीटी दर हा 1.58% इतका आहे. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना शिवायही होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 0.7% इतके आहे. कोरोनाशिवाय इतर कारणांमुळे होणाऱ्या मुंबईतील मृत्यूचे प्रमाण हे 39.4% इतके आहे. कोरोनाची पहिली लाट उच्च टोकावर असताना महाराष्ट्रातील हे प्रमाण 0.8% तर मुंबईतील प्रमाण 12% इतके होते.
दरम्यान, मुंबईतील कोरोना मृत्यूचे आकडे महापालिका आणि सरकार लपवत असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर मुंबईचे महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मुंबईत कोणत्याही प्रकारे मृत्यूंची आकडेवारी लपवली जात असल्याचे म्हटले होते. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यंत्री राजेश टोपे यांनीही महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची आकडेवारी लपवली जात नाही, असे म्हटले होते.