Coronavirus in India (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रामध्ये मुंबई (Mumbai), ठाण्यापाठोपाठ पुणे (Pune) हे कोरोनाचं हॉटस्पॉट आहे. आज पुणे आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मागील 24 तासांत पुण्यात सर्वाधिक 823 कोरोना बाधित रूग्ण समोर आले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाग्रस्त समोर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. सध्या पुण्यामध्ये कोरोनाची लागण झालेल्यांची एकूण संख्या 15, 004 पर्यंत पोहचली आहे तर 584 जणांचा मृत्यू झाला आहे. तर मागील 24 तासामध्ये पुणे शहरामध्ये 24 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यामध्ये महाराष्ट्रातील पहिला कोरोनाबाधित रूग्ण मार्च 2020 मध्ये सापडला होता. ते दुबईमधून पुण्यात आले होते. मागील 3 महिन्यात सातत्याने पुण्यात कोरोनाबाधितांच्या आकड्यामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्येही आता अस्वस्थता वाढत आहे. दरम्यान भवानी पेठेमध्ये मध्यंतरी मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रूग्ण समोर आले होते. मात्र त्याठिकाणी फैलाव रोखण्यास प्रशासनाला यश आलं आहे. परंतू आता इतर भागामध्ये कोरोना फैलावत आहे.

ANI Tweet

महाराष्ट्रातही काल (20 जून) रात्री आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवाडीनुसार सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. काल दिवसभरात 3874 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून राज्यात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 1लाख 28 हजार 205 वर पोहोचली होती. तर दिवसभरात राज्यात 160 रुग्ण दगावले असून मृतांची एकूण संख्या 5984 वर पोहोचली आहे अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.