सध्या संपूर्ण महाराष्ट्र कोरोना विषाणूच्या (Coronavirus) साथीच्या सर्वात वाईट काळातून जात आहे. मुंबई, ठाणे, नागपूर यांसह राज्यातील प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या पुण्यातील (Pune) परिस्थिती भीषण होत चालली आहे. पुणे शहरात काल 5,600 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे इथल्या खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये बेड आणि व्हेंटिलेटरची कमतरता भासू लागली. परिस्थिती इतकी बिकट होत चालली आहे की, आता महापालिकेला सैन्यदलाची (Indian Army) मदत घ्यावी लागत आहे. सैन्यानेही मदत करण्यास सहमती दर्शविली असल्याचा दावा केला जात आहे.
पुण्यातील लष्करी रुग्णालयात 335 बेड आणि 15 व्हेंटिलेटर आहेत. अशा परिस्थितीत पुणे महानगरपालिकेने लष्कराला रुग्णालयाचे बेड व व्हेंटिलेटर देण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणात सैन्याकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याचे सांगितले जात आहे. संध्याकाळपर्यंत सैन्यदलाकडून मदत मिळणार असल्याचे पालिका आयुक्त सांगतात. केवळ पुणे कॅन्टोन्मेंटमधील कोविडची पुष्टी केलेली प्रकरणेच लष्कराच्या सुविधेमध्ये दाखल करता येतील, असे सांगण्यात आले आहे. सध्या पुण्यात 445 व्हेंटिलेटर असून सर्वांवर रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
कोरोना विषाणूमुळे पुण्याव्यतिरिक्त महाराष्ट्रातील इतरही अनेक जिल्ह्यांमध्ये कोविडची परिस्थिती बिकट झाली आहे. राज्यात रुग्णसंख्या वाढत असताना ऑक्सिजनच्या मागणी वाढ होत आहे. राज्यात दररोज 1200 मेट्रिक टन ऑक्सिजनचे उत्पादन होत असून, त्यापैकी 80 टक्के वापर वैद्यकीय कारणासाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रालगतची जी राज्य आहेत जेथे ऑक्सिजनचा वापर जास्त नाही, त्यांच्याकडून ऑक्सिजनचा पुरवठा महाराष्ट्राला व्हावा यासाठी केंद्र शासनाने या राज्यांना निर्देश देण्याची विनंती राजेश टोपे यांनी केली आहे. (हेही वाचा: कोरोना लसीवरुन केंद्रीय मंत्री हर्षवर्धन आणि महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची विरोधाभासात्मक विधाने)
दरम्यान, पुणे शहरात काल नव्याने 5,600 रुग्णांची नोंद झाली असून, एकूण संख्या 2,99,721 झाली आहे. काल शहरात 3,481 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत 2,49,373 रुग्ण बरे झाले आहेत. काल पुण्यात 38 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, यासह एकूण मृत्यूंची संख्या 5,526 वर गेली. पुण्यामध्ये सध्या 44,822 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.