Coronavirus in Mumbai: मुंबई शहरात COVID 19 उद्रेक, दिवसभरात 5 हजार जणांना कोरोना व्हायरस संक्रमण
Coronavirus in Mumbai | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई शहरात नियंत्रणात आलेले कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट पुन्हा एकदा नव्याने विस्तारताना दिसत आहे. मुंबई महापालिकेने (BMC) दिलेल्या आकडेवारीनुसार आज (24 मार्च) सायंकाळी 6 वाजेपर्यंत शहरात तब्बल 5 हजार जणांना कोरोना व्हायरस संसर्ग (Coronavirus in Mumbai) झाला. 2088 जण उपचार घेऊन बरे झाले. तर, 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या काही काळातील मुंबई शहरातील ही सर्वोच्च आकडेवारी आहे. त्यामुळे मुंबईत COVID 19 उद्रेक झाल्याचे मानले जात आहे.

मुंबई शहरातील कोरोना रुग्णांची संख्या 3,74,611 वर पोहोचली आहे. आतापर्यंत कोरोनावर उपचार घेऊन बरे झालेल्यांची संख्या 3,31,322 इतकी आहे. मुंबईत सध्या स्थितीत 30,760 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शहरात आतापर्यंत 11606 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (हेही वाचा, Coronavirus in Maharashtra: घाबरु नका पण काळजी घ्या, कोरोना रुग्णसंख्येत सर्वाधिक अॅक्टिव्ह असलेल्या 10 जिल्ह्यांपैकी नऊ महाराष्ट्रात)

दरम्यान, मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, आज (24 मार्च) ज्या कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला त्यांना पूर्वीपासूनच काही दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये 3 पुरुष व 3 महिला आहेत. 5 रुग्ण हे 60 वर्षे वयोगटावरील होते. एका रुग्णाचे वय 40 ते 60 दरम्यान होते.

मुंबई जिल्हायत आतापर्यंत कोरोना रुग्णांचे बरे होण्याचा सरासरी दर 90% इतका आहे. 17 मार्च ते 23 मार्च 2021 या काळात मुबईतल कोरोना रुग्णवाढीचा दर हा 0.79% इतका राहिला. 23 मार्च 2021 पर्यंत मुंबई शहरात एकूण 37,94,500 चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईत कोरोना दुप्पटीचा दर 84 दिवसांवर गेला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 31,855 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. तर 15098 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. गेल्या 24 तासात 95 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे., अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.