महाराष्ट्रात कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 93 टक्क्यांवर पोहोचले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. काल (28 मे) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत लॉकडाऊन (Lockdown In Maharashtra) आणखी पुढे वाढवावा अशी मागणी पुढे आली. तर ज्य ठिकाणी कोरोना व्हायरस संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे, अशा ठिकाणी काहीशी शिथीलता द्यावी यावरही विचार झाला. राज्यातील एकूण स्थितीचा आढावा घेऊन अंतिम निर्णय लवकरच जाहीर केला जाईल, असेही राजेश टोपे यांनी या वेळी सांगितले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी बोलताना राजेश टोपे यांनी सांगितले की, राज्यातील काही ठिकाणी कोरोना संक्रमणाचा सरासरी दर हा 10% पेक्षा अधिक असल्याचे पुढे येत आहे. असे असेल तर आपल्याला 'गो स्लो' पद्धतीने पुढे गेले पाहिजे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन आणखी 15 दिवस पुढे ढकलण्याचा विचार आहे. याशिवाय सार्वजनिक आणि खासगी ठिकाणी गर्दी करणारे सर्वच कार्यक्रम बंद असणार आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले असेल अशा ठिकाणी काही प्रमाणात शिथिलता दिली जाऊ शकते. मात्र, अंतिम निर्णय जाहीर करतानाच याबाबत सविस्तर सांगता येईल, असेही राजेश टोपे म्हणाले. (हेही वाचा, Lockdown In Maharashtra: लॉकडाऊन कधी हटणार? कॅबिनेटमंत्री अस्लम शेख यांनी दिले उत्तर)
एएनआय ट्विट
The recovery rate in the state has reached 93%. In yesterday's Cabinet meeting it was discussed that lockdown should be extended for 15 days but relaxations can be given in districts where cases have gone down, final decision will be announced soon: Maharashtra Min Rajesh Tope pic.twitter.com/o8Iga1TxfD
— ANI (@ANI) May 28, 2021
राज्यातील म्यूकर मायकोसीस रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार केले जात आहेत. त्यामुळे म्यूकरमायकोसीस रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा. राज्यात आतापर्यंत या योजनेंतर्गत म्यूकरमायकोसीसच्या 131 रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. म्यूकरमायकोसीस रुग्णांसाठी आवश्यक इंजेक्शनच्या पुरवठ्याबाबत बोलताना राजेश टोप यांनी सांगितले की, या इंजक्शन्सचा पुरवठा करण्याचे अधिकार केंद्र सरकारकडे आहेत. त्यामुळे केंद्राकडून महाराष्ट्राच्या झोळीत जेवढी इंजेक्शन्स येतील त्यातूनच वाटप केले जाईल, असे टोपे यांनी सांगितले.