देशात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) जोर आता चांगलाच वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. राज्य सरकारने कडक पावले उचलत, राजधानी मुंबई (Mumbai) सह चार शहरांमध्ये अनेक सेवा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी रेशन, भाजीपाला, दूध, औषधांची दुकाने यासारख्या जीवनावश्यक वस्तू वगळता बाजारपेठा बंद राहतील. त्यात घरगुती गॅस आणि पेट्रोल पंपांना (Petrol Pumps) लॉकडाऊनपासून वगळण्यात आले आहे. मुंबई, पुण्यासारख्या शहरांत पेट्रोल पंप सुरु असतील, परंतु फक्त 12 तासच इथून पेट्रोल घेण्याची मुभा असेल. 31 मार्च पर्यंत पुण्यात 8 तास व मुंबई येथे 12 तासच पेट्रोल पंप चालू राहणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले आहे. आज देशात सर्वत्र त्याचे पालन होताना दिसत आहे. अशात एक दिवस आधी, म्हणजे शनिवारी पेट्रोल पंप डीलर्सकडून सांगण्यात आले आहे की, सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीस त्यांच्याकडूनही पाठींबा आहे. मुंबई पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनने शनिवारी जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, सोमवार, 23 मार्च ते 31 मार्च दरम्यान, सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेतच पेट्रोल पंप खुले ठेवण्यात येतील.
(हेही वाचा: नागपूर शहरातील नागरिकांचे लॉकडाऊनकडे दुर्लक्ष; पहिल्याच दिवशी 348 जणांवर कारवाई)
पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही संसर्ग होण्याचा धोका आहे, परंतु जनतेची गैरसोय टाळण्यासाठी पंप 12 तास खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे एएनआयशी बोलताना पुणे पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष, सागर रुकारी यांनी सांगितले की, पुण्यातील पेट्रोल पंप सकाळी 8 ते संध्याकाळी 4 पर्यंतच खुले राहतील. सध्या पुणे व मुंबई दोन्ही शहरांत कलम 144 लागू करण्यात आले आहे. मात्र पेट्रोल पंपावर लोक गर्दी करत आहेत. हीच गोष्टी टाळण्यासाठी पेट्रोल डिलर्स असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे.