Coronavirus: महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली, तर ती सर्वांनाच महागात पडेल; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून जनतेला इशारा
Rajesh Tope (Photo Credit: Twitter)

लॉकडाउननंतर जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच राजधानी दिल्ली कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना झपाट्याने पसरत असून, दिल्लीपाठोपाठ मुंबईतही कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. यातच मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातही (Maharashtra) कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी व्यक्त केली आहे. तसेच महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली, तर ती सर्वांनाच महागात पडेल. राज्यात लाट येऊ नये असे वाटते, पण मनात भीती आहे,” असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

राजेश टोपे यांनी रत्नागिरीत प्रसार माध्यमांशी संपर्क साधला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. “दिल्लीत सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. महाराष्ट्र सरकारने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने केरळ आणि दिल्लीचा बोध घ्यावा. केरळ आणि दिल्लीमध्ये कोरोनाचा प्रसार वाढत आहे. मास्कचा वापर टाळणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन न झाल्यामुळे दिल्ली आणि केरळमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली आहे. महत्वाचे म्हणजे, कुणीही कोरोनाला गृहीत धरू नये. या संकट काळात प्रत्येकाने काळजी घ्यावी, स्वंयशिस्त पाळली पाहिजे, तरच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर मात करणे शक्य होईल, असेही राजेश टोपे म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Coronavirus: मुंबई-दिल्ली विमान, रेल्वे सेवा पुन्हा एकदा बंद होण्याची शक्यता, प्रस्ताव विचाराधीन असल्याची चर्चा

दरम्यान, मुंबई महापालिकेने आपल्या हद्दीतील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी या संदर्भातील आदेश दिले आहेत. यामुळे आता मुंबईतील शाळा थेट नवीन वर्षीच उघडल्या जाणार आहेत. राज्यातील अनेक ठिकाणी 23 नोव्हेंबरपासून शाळा आणि महाविद्यालये सुरू होणार असताना मुंबईत मात्र असा निर्णय घेण्यात आला आहे.