Chief Minister Uddhav Thackeray (PC - Twitter)

सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने पुन्हा एकदा अनेक निर्बंध लागू केले आहेत. गेल्यावर्षी ऑक्टोबरपासून राज्यात सर्व व्यवहार सुरु केले आणि त्यानंतर सुमारे 4 महिने कोरोनाचा संसर्ग रोखला. मात्र आता मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी आणि नियम न पाळल्याने संसर्ग वाढत आहे. त्यामुळे, अजूनही परिस्थिती नियंत्रणात असून हॉटेल व उपाहारगृहांनी नियमांचे पालन करावे, कडक लॉकडाऊन करण्यास भाग पडू नये, हा शेवटचा इशारा आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. आज त्यांनी ते आहार, नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन, शॉपिंग सेन्टर्स असोसिएशन यांच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन संवाद साधला व सहकार्याचे आवाहन केले.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, गेल्या 4 महिन्यात सर्व व्यवस्थित होत होते. आपल्याच राज्यात नव्हे तर अगदी युरोपमध्ये सुद्धा जणू काही कोरोना गेल्यासारखे सर्व व्यवहार मोकळेपणाने सुरु झाले होते. मात्र अचानक सर्वत्रच संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून तिकडे ब्राझीलमध्ये भयानक स्थिती झाली आहे. आपल्याला युरोपसारखी परिस्थिती होऊ द्यायची नसेल तर काटेकोरपणे आरोग्याचे नियम पाळावे लागतील. पुढच्या काळात देखील आपल्याला कोविडबरोबरच जगायचे असून जीवनपद्धती त्याला अनुरूप करावी लागेल. बंदी आणि स्वयंशिस्त यात फरक असून सर्वांनी याचे भान ठेवावे असेही ते म्हणाले.

हॉटेल्स आणि उपाहारगृहे हे भेटीगाठी व जेवण-नाश्त्याचे प्रमुख ठिकाण असून सुरुवातीच्या काळात नियमांचे पालन होताना दिसत होते. हॉटेल्समध्ये समोरासमोर न बसवता सुरक्षित अंतर ठेऊन बसविणे, वेटर्स आणि इतर कर्मचारी यांनी मास्क घालणे, जंतुनाशक फवारणी असे होत होते. पण राज्यभरात आता काही हॉटेल्स, मॉल्स, उपाहारगृहांत नियमांची पायमल्ली होऊन वातावरण सैल झाल्यासारखे प्रशासनाला दिसत आहे. लॉकडाऊन लावून सगळे बंद करणे आम्हालासुद्धा आवडत नाही. आपण हे अर्थचक्र सुरु केले आहे, सर्वांनी सहकार्य केले तर संसर्ग रोखता येईल, त्यामुळे लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध लावण्यास भाग पडू नका, असेही मुख्यमंत्री म्हणाले. (हेही वाचा: Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 1708 रुग्णांची नोंद; सध्या 13,247 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु)

पालिका आणि पोलीस प्रशासनालाही यासंदर्भात राज्यातील सर्व हॉटेल्स व उपाहारगृहे काटेकोर पालन करतात किंवा नाही तसेच नियम तोडत असतील तर कारवाई करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.