Coronavirus: ठाणे येथे पोलिसांचे क्वारंटाईन सेंटर असलेल्या हॉटेल कॅपीटलमध्ये हुक्का पार्टी
Hookah Party | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट असतानाच्या काळात हुक्क्याचे बार, डीजे म्युजिक आणि झिंगलेल्या तरुण, तरुणींचा मदमस्त नाच, अशा बेधुंद वातावरणात ठाणे (Thane) येथील एका हॉटेलात हुक्का पार्टी रंगली. हे हॉटेल म्हणे ठाणे पोलिसांसाठी क्वारंटाईन सेंटर ( Police Quarantine Center) होते. माजिवाडा नाक्यावर असलेल्या हॉटेल कॅपिटल ( Hotel Capitol) येथे हा सगळा प्रकार घडला. या प्रकाराच एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी तातडीने दखल घेतली आणि कारवाई केली. ठाणे मनपा आयुक्त विजय सिंघ यांनी ठाणे पोलिसांसाठी माजिवाडा येथील हॉटेल क्वारंटाईन सेंटर म्हणून आरक्षित केले होते.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, हा प्रकार कधीपासून सुरु होता याबाबत माहिती समजू शकली नाही. कोरोना व्हायरस काळात कोणत्याही कारणास्तव एकत्र येण्यास मनाई आहे. तसेच, सोशल डिस्टन्सिंगचे पालन काळजीपूर्वक केले जावे यासाठीही प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, सर्वच नियमांचे उल्लंघन करत या पार्टीबहाद्दर तरुण, तरुणींनी कायदा धाब्यावर बसवला. यामुळे कोरोना व्हायरस संसर्ग वाढल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, ठाणे मनपा आयुक्त विजय सिंघ यांनी ठाणे पोलिसांसाठी माजिवाडा येथील हॉटेल क्वारंटाईन सेंटर म्हणून आरक्षित केले होते. या हॉटेलमध्ये 32 खोल्या आहेत. त्यापैकी 25 खोल्या या कोरना व्हायरस संक्रमनसदृश्य लक्षणं आढळणाऱ्या पोलिसांसाठी आरक्षित होत्या. याच ठिकाणी पोलिसांची क्वारंटाईन सोय करण्यात आली होती. (हेही वाचा, Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज 1,257 कोरोना विषाणू रुग्णांची व 55 मृत्यूंची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 1,05,829 वर)

दरम्यान, प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार गेले पाच दिवस या हॉटेलमधील एक खोली एकाच व्यक्तिच्या नावावर आरक्षीत (बुक) होती. याच खोलीत काही तरुण आणि तरुणी असे 12 ते 15 जण हुक्कापार्टी करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत काही मंडळी विनामास्क नाचत असल्याचेही दिसते आहे. व्हिडओ व्हायरल होताच पोलिसांनी घटनास्थळी हजेरी लावली. मात्र, त्या ठिकाणी व्हिडओत दिसत असेलला मुद्देमाल सापडला नसल्याचे समजते. तसेच पोलिसांनी पार्टी करणाऱ्या सर्वांवर नोटीस बजावल्याचे वृत्त आहे.