Coronavirus: लोकांनी सहकार्य नाही केले, गेल्या 24 तासात कोरोना व्हायरसचे 227 रुग्ण वाढले: केंद्रीय आरोग्य मंत्रालय
Lav Aggarwal, Joint Secretary, Health Ministry | (PC - ANI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक प्रयत्न करत आहे. तरीही देशातील कोरोना व्हायरस संकटाचे आव्हान अद्याप कमी होताना दिसत नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालय (Health Ministry ) सचिव लव अगरवाल (Lav Aggarwal, Joint Secretary, Health Ministry) यांनी आज (31 मार्च 2020) घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, गेल्या 24 तासात तब्बल 227 रुग्ण कोरोना व्हायरस बाधित आढळले आहेत. त्यामुळे भारतातील कोरोना व्हायरस बाधितांची संख्या आता 1251 इतकी झाली आहे. त्यातील 102 रुग्ण हे उपचारानंतर बरेही झाले आहेत. मात्र, असे असले तरी देशातील नागरिकांकडून अपेक्षीत प्रतिसाद मिळात नाही. त्यामुळेच कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

देशात महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांमध्ये कोरोना व्हायरस बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या दोन राज्यांपाठोपाठ दिल्लीमध्येही कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. निजामुद्दीन मजरक येथे एकाच दिवसात तब्बल 24 रुग्ण हे COVID-19 पॉझिटव्ह आढळले आहेत.

एएनआय ट्विट

सोशल डिस्टंन्सींग बाबत पुन्हा एकदा आठवण करुन देत लव अगरवाल यांनी सांगितले की, नागरिकांनी लॉकडाउन काळात सहकार्य करणे अपेक्षीत आहे. तसेच, देशातील डॉक्टर्स, आरोग्य यंत्रणा, पोलीस तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना जनतेने सहकार्य करावे. त्यांच्याशी चांगले वर्तन करावे. घरमालकांनी आपल्या भाडेकरुंकडे घरभाड्यासाठी तगादा लाऊ नये. जनतेने सहकार्य केले नाही तर कोविड-19 हे संकट अधिक गहीरे होत जाईल, असेही अगरवाल यांनी या वेळी सांगितले. (हेही वाचा, Coronavirus Update: महाराष्ट्रात आणखी 5 नवे रुग्ण आढळले; राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 230 वर)

एएनआय ट्विट

दरम्यान, याच पत्रकार परिषदेत आयसीएमआरने सांगितले की, भारतात आतापर्यंत सीओव्हीआयडी-19 म्हणजेच कोरोना व्हायरस नमुन्यांच्या 42,788 चाचण्या झाल्या आहेत. त्यातील 4346 नमुन्यांची चाचणी सोमवारी झाली. हा आकडा आयसीएमआरच्या क्षमतेच्या 36 टक्के बरोबरीत आहे. सोबत असेही सांगण्यात आले की, संबध देशात एकूण 123 लॅब कार्यरत आहेत. 49 खासगी लॅबनाही कोरोना व्हायरस चाचणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सोमवारी देशातील खासगी लॅबमध्ये 399 नमुन्यांची चाचणी करण्यात आली.