कोरोना व्हायरस संकटात नुकसान भरपाई देण्यात येणार असा दावा करणारा मेसेज खोटा; पिंपरी चिंचवड पोलिसांनी ट्विट करत नागरिकांना केले सतर्क
पोलीस-प्रातिनिधिक प्रतिमा | (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरस संकटाला देशातील सर्वच नागरिक सामोरे जात आहेत. या कठीण काळात लोकांसमोर अजून एक समस्या उभी राहिली आहे. ती म्हणजे फेक मेसेजेची. कोरोना संकट तीव्र होत असतानाच अनेक फेक मेसेजेस, खोटी माहिती सोशल मीडियावर जोर धरु लागली आहे. त्यामुळे नागरिकांचा अधिकच गोंधळ उडत आहे. असाच एक मेसेज सोशल मीडियावर फिरत आहे. कोरोना नुकसान भरपाई उपक्रमाअंतर्गत तुम्ही 250000 युएस डॉलर जिंकले आहात असे या मेसेज मध्ये लिहिले असून खाली एक लिंक दिली आहे. त्या लिंकमध्ये तुमची वैयक्तिक माहिती भरण्यास सांगितली आहे. मात्र हा मेसेज खोटा असून त्या लिंकवर क्लिक करुन माहिती भरल्यास आर्थिक नुकसानाला तुम्हाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांनी ट्विट करत नागरिकांना सतर्क केले आहे.

अशा प्रकारच्या बनावट मेसेजेंना प्रतिसाद देऊ नका. सावध आणि सतर्क रहा, असे आवाहनही पोलिसांनी ट्विटच्या माध्यमातून केले आहे. त्यामुळे तुमच्यापैकी कोणाला असा मेसेज आल्यास त्याकडे दुर्लक्ष करा. लिंकवर क्लिक करुन आपली कोणतीही वैयक्तिक माहिती भरु नका. (पुण्यामध्ये 42 वर्षीय पोलिस कॉन्स्टेबल व त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण)

Pimpri Chinchwad Police Tweet:

महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधितांची संख्या देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. त्यापैकी मुंबई, पुणे शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्यात एकूण 504 कोरोना बाधित रुग्ण असून 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 43 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.