महाराष्ट्राला रेमडेसिवीर (Remdesivir ) इंजेक्शन मिळू नये यासाठी भारतीय जनता पक्ष (BJP) प्रयत्न करत आहे. त्यामुळेच रेमडेसीवीर औषधांचा साठा करणाऱ्या कंपन्यांचे महाराष्ट्रातील भाजप नेते वकीलपत्र घेत आहे, असा घणाघात राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. ब्रुक फार्मा कंपनीचे मालक विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या मार्फत सरकारकडे आले होते. ते अन्न व औषध मंत्री राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingne) यांना भेटले होते, असा पुनरुच्चारही नवाब मलिक यांनी केला आहे. रेमडेसिवीर औषधावरुन महाराष्ट्रात गेले दोन दिवस जोरदार राजकारण सुरु आहे. राजकीय आरोपप्रत्यारोप सुरु आहेत.
भारतीय जनता पक्ष ट्विट करुन माहिती देतो की सुमारे 50 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन आम्ही उपलब्ध करुन देणार आहोत. दुसऱ्या बाजूला राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा असतो. रेमडेसिवीर उत्पादन करणाऱ्या कंपन्या राज्य सरकारने मागितल्यास औषध द्यायला तयार नसतात. याचा अर्थ काय होतो? ब्रुक फार्मा नावाच्या कंपनीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा सुमारे 50 ते 60 हजार डोसचा साठा असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिस या कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी बोलावतात. या कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी बोलावल्यानंतर विरोधी पक्षनेता असलेले भाजप नेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर पोलीस स्टेशनला जातात. औषध कंपनीच्या मालकांची वकिली करतात. हे सगळे कशासाठी. महाराष्ट्रात रेमडेसिवीर औषधांचा काळाबाजार सुरु असल्याची माहिती मिळते आहे. असा प्रकार सुरु असल्याचे स्पष्ट झाल्यास कोणीही असले तरी त्याच्यावर कारवाई ही केलीच जाईल, असे मलिक यांनी या वेळी सांगितले. (हेही वाचा, Coronavirus: महाराष्ट्र पोलिसांनी Remdesivir पुरवठादारांना त्रास दिला- देवेंद्र फडणवीस)
रेमडेसिवीर औषध उत्पादन करणाऱ्या एकूण कंपन्यांपैकी दोन कंपन्यांनाच हे औषध निर्माण करण्याचा परवाना आहे. दुसऱ्या बाजूला इतर कंपन्यांकडे हा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. यातील काही कंपन्या आम्हाला मार्केटींग करण्याची परवानगी द्या अशी मागणी करत सरकारकडे आल्या होत्या. सरकारने ही मागणी फेटाळून लावली. तुमच्याकडे असलेला साठा राज्य सरकारला द्या असे या कंपन्यांना बजावले, असेही नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
ब्रुक फार्मा कंपनीच्या संचालकांना महाराष्ट्र पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले. हे संचालक मुंबईतील पार्ले पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्याच वेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर हे पोलिस स्टेशनला पोहोचले. त्यांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या संचालकांना चौकशीसाठी बोलावले म्हणून पोलिसांना जाब विचारला. या वेळी बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, या कंपन्या भाजपला औषध देण्यास तयार होत्या. परंतू, हे औषध आम्हाला मिळू नये यासाठी सरकार कंपन्यांवर दबाव टाकत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केला होता. राज्यात रेमडेसिवीर औषधावरुन राजकारण चांगलेच तापले आहे.