Coronavirus: कोरोना व्हायरसच्या संकटकाळात Uber कडून महाराष्ट्रात एक कोटींच्या मोफत राईड्सची घोषणा
Uber (Photo Credits: Wikimedia Commons)

सध्या या कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) काळात सरकारच्या मदतीसाठी अनेक हात पुढे आले आहेत. सेलेब्ज, धर्मादाय संस्था, सामान्य नागरिक असे अनेकजण कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत करत आहेत. आता ‘उबर इंडिया’ने (Uber India) या संकटात आपल्या मदतीची घोषणा केली आहे. उबरने शुक्रवारी महाराष्ट्र सरकारला (Maharashtra Goverment) आपत्कालीन सेवांसाठी एक कोटी रुपयांच्या मोफत राईड्सद्वारे (Free Rides) मदतीची घोषणा केली. ही सेवा आरोग्य सेवेचे कर्मचारी, कोरोना व्हायरस संबंधित कर्मचारी आणि या व्हायरसशी निगडीत कामावर असलेल्या लोकांसाठी असणार आहे.

उबर इंडिया ट्विट -

याबाबत बोलताना उबरचे मुख्य कार्यकारी अधिकारी दारा खोसरोशाही म्हणाले की, ‘राज्य सरकारबरोबरची उबरची भागीदारी ही, उबरच्या जागतिक 10 दशलक्ष राइड्स आणि अन्नपुरवठा विनामूल्य करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा एक भाग आहे.’ उबरने जाहीर केलेली सेवा ही मुख्यत्वे वैद्यकीय सेवेतील कर्मचारी, आपत्कालीन नॉन-कोरोनाव्हायरस रूग्ण आणि सरकारी कर्मचारी यांच्यासाठी असणार आहे.

याबाबत बोलताना उबर इंडिया आणि दक्षिण आशियाचे संचालक, ऑपरेशन्स आणि शहर प्रमुख प्रभजित सिंह म्हणाले की, 'महाराष्ट्र सरकार कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहे. आमचा जागतिक अनुभव, तंत्रज्ञान आणि ड्रायव्हर्सच्या नेटवर्कचा फायदा घेऊन आम्ही त्यांना हातभार लावण्याचा प्रयत्न करू.'

उबरकडून राज्य सरकारला पुरविल्या जाणाऱ्या सर्व उबरमेडिक कारमध्ये चालकाशी जास्त संपर्क येणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. यासाठी खास प्लास्टिक शिट्सचा वापर केला जाणार आहे. याव्यतिरिक्त, सुरक्षितता व स्वच्छतेचे निकष राखण्यासाठी सर्व वाहन चालकांना सुरक्षितता प्रक्रियेचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामध्ये मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर्स आणि जंतुनाशकांसारखी वैयक्तिक संरक्षक उपकरणे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. (हेही वाचा: केशरी रेशन कार्ड धारकांना 3 किलो गहू 8 रुपये किलो तर 2 किलो तांदूळ 12 रुपये प्रति किलोने देणार- राज्य सरकारचा निर्णय)

यासह उबरने दिल्ली सरकारला 200 टॅक्सी दिल्या आहेत, ज्या 12 तासांच्या शिफ्टमध्ये काम करतील. या टॅक्सींमध्ये कोरोनाचे रुग्ण नाहीत, तर नॉन कोविड आणि गैर-गंभीर रूग्णांनाच रुग्णालयात नेले जाईल. ही सेवा 3 मेपर्यंत चालू राहणार आहे.