Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाचे दिवसागणिक रुग्ण आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तर कोरोनाबाधित रुग्णांवर डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून दिवसरात्र उपचार केले जात आहेत. तरीही कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबई आणि पुणे येथे आढळून आले आहेत. याच पार्श्वभुमीवर पुण्यात (Pune) आता एका 44 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबतची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. नागरिकांना वारंवार घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले असले तरीही गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे.

पुण्यात तर सकाळच्या वेळेस नागरिक मॉर्निंग वॉकला जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पोलिसांनी मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांची रस्त्यावरच चांगलीच कसरत करुन घेतली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून ही नागरिक बेजबाबदारपणे वागत आहेत. तर पुण्यात आता पर्यंत कोरोनामुळे 49 जणांचा बळी गेला आहे. तर गुरुवारी सुद्धा दिवसभरात पुण्यात कोरोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाला होता.(Coronavirus: महाराष्ट्रात आतापर्यंत 23 पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह) 

दरम्यान, महाराष्ट्रात एकूणच कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना पासून बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 3 हजारांच्या पार गेला आहे. तर मृतांचा आकडा 194 वर पोहचला आहे. पीपीई किट आणि मास्क उत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.