Shiv Sena MLA Sanjay Gaikwad: शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या कुटंबातील 12 जण Coronavirus संक्रमित
Sanjay Gaikwad | (File Photo)

राज्यातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट पुन्हा एकदा डोके वर काढते की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांपैकी एक असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातही कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढते आहे. बुलढाण्यातील शिवसेना (Shiv Sena) आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्या कुटुंबातील तब्बल 12 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, संजय गायकवाड यांची पत्नी, सुन, दोन पुतणे, वहिणी, त्यांचे भाचे आणि कुटुंबातील इतर काही सदस्य यांना हा संसर्ग झाला आहे. धक्कादायक म्हणजे गायकवाड यांची अवघ्या 12 दिवसांच्या नातीलाही कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, आमदार संजय गायकवाड यांच्या कुटुंबातील 12 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याची माहिती आजच पुढे आली. या सर्वांचा कोरोना व्हायरसच चाचणी अहवाल आज (6 मार्च) पॉझिटीव्ह आला. दरमयान, गायकवाड यांच्या कार्यालयातील टायपीस्ट आणि त्यांचा वाहनचालक यांचा कोरोना अहवालही पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे या सर्वांवर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. त्यामुळे गायकवाड यांचे कार्यालयही काही काळ बंद असणार आहे, असे गायकवाड यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, टेक ऑफ पूर्वी विमानात कोरोना रुग्ण आढळल्याने उडाला एकच गोंधळ; संपूर्ण विमान केलं रिकामं)

राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनासाठी आमदार संजय गायकवाड हे मुंबईमध्ये आहेत. त्यामुळे स्वत: गायकवाड व त्यांच्यासोबत असलेली टीम स्वत: कोरोना निगेटीव्ह आहे. संजय गायकवाड हे आज (6 मार्च) बुलढाणा येथील घरी येणार आहेत. असे असले तरी त्यांनी आपणास कोणीही संपर्क करु नये, असे अवाहन गायकवाड यांनी केले आहे. दरम्यान, शनिवारी घरी आल्यानंतर गायकवाड रविवारी पुन्हा मुंबईला निघणार आहेत.