Coronavirus: 10 रुग्ण कोरोना व्हायरस पॉझिटीव्ह आढळल्यास इमारत सील करणार, मास्क नसल्यास 200 रुपये दंड- मुंबई महापालिका
BMC | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) हद्दीत नियंत्रणात आलेली कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. त्यामुळे मुंबई महापालिका (BMC) प्रसाशन पुन्हा एकदा सतर्क झाले आहे. कोरोना व्हायरस चाचण्या वाढविण्यासोबतच मास्क वापरण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. तसेच, कोरोना नियंत्रणासाठी महापालिकेने काही नवे नियमही जाहीर करण्यात आले आहेत. एखाद्या इमारतीत 10 पेक्षा अधिक कोरोना व्हायरस संक्रमित रुग्ण आढळल्यास ती इमारत काही दिवसांसाठी सील केली जाईल. तसेच मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना 200 रुपये दंड आकारला जाईल, असेही पालिकेने म्हटले आहे.

एबीपी माझा या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार मुंबई महापालिकेने कोरोना व्हायरस रुग्णांची वाढती संख्या पुन्हा एकदा नियंत्रणात आणण्यासाठी नवे मिशन हाती घेतले आहे. त्यासाठी पालिका कर्मचारी घरोखरी, गल्लोगल्ली जाऊन संपर्क अभीयान राबवणार आहेत. चेस द व्हायरस म्हणत कोरोना व्हायरस चाचण्याही मोठ्या प्रमाणावर वाढवणार आहे.

मुंबई शहरात कोरोना व्हायरस संसर्गाचे प्रमाण रोखायचे कसे? याबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात होती. परंतू, मुंबई महापालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाने केलेल्या प्रभावी अंमलबजावणीमुळे मुंबई शहरातील कोरोना व्हायरस संसर्ग नियंत्रणात ठेवण्यास पालिकेला काही प्रमाणात यश मिळाले. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई शहरात पुन्हा एकदा कोरोना व्हायरस सुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे महापालिका सतर्क झाली असून, नव्या नियमांसह नवे अभियान पालिकेने हाती घेतले आहे. (हेही वाचा -Coronavirus In Maharashtra Police: महाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 311 जणांना कोरोनाची लागण तर 5 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू)

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कोरोना व्हायरस संसर्गाची साखळी तोडण्याचे अवाहन जनतेला केले आहे. त्यासाठी ठाकरे यांनी 'माझं कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहीमही सुरु केली आहे. या मोहिमेंतर्गत लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिक यांनी स्वत:च्या कुटुंबाला प्राधान्य द्यायचे आहे. जेणेकरुन कोरोना व्हायरस संसर्गापासून स्वत:च्या कुटुंबाला दूर ठेवायचे आहे. ही मोहीम मोठ्या प्रमाणावर यशस्वी करा असेही, ठाकरे यांनी म्हटले आहे.