महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या मातोश्री शारदाताई टोपे (Shardatai Tope) यांचे शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजेश टोपे पंधरा दिवसाऐवजी केवळ 3 दिवसांचा दुखवटा पाळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शारदाताई यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यांच्यावर आज जालना जिल्ह्यामधील अंबड तालुक्यातील पार्थपूर या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. राजेश टोपे यांच्या मातोश्रीच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी त्यांचे सांत्वन केले होते.
राजेश टोपे यांच्या मातोश्री 74 वर्षाच्या होत्या. तसेच त्या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखान्याच्या अध्यक्ष होत्या, त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे. कोरोनामुळे जिल्ह्यांचे आढावा दौरे, सततच्या बैठका यात वेळात वेळ काढून आरोग्यमंत्री टोपे आईला भेटायला हॉस्पीटलमध्ये जायचे. रोज सकाळी आईला भेटून दिवसाची सुरूवात ते करायचे. ती अजातशत्रु होती. एका शब्दानेही तिने कुणाला दुखावले नाही. सर्वांना प्रेम दिले. माझ्या वडिलांच्या सोबत ती सावली सारखी राहिली. 4 वर्षांपूर्वी वडिल गेल्यानंतर ती आधार होती. दोन दिवसांपूर्वी तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवत मला आर्शिवाद दिले. तो आशिर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील, अशी भावना राजेश टोपे यांनी मातोश्रीच्या मृत्यूनंतर व्यक्त केल्या होत्या. हे देखील वाचा- Shiv Sena Corporator Sunil Surve Passed Away: शिवसेना पक्षाचे जेष्ठ नगरसेवक सुनील सुर्वे यांचे आज निधन
राजेश टोपे यांचे ट्वीट-
कोरोना पार्श्वभूमीवर पंधरा दिवसा ऐवजी तीन दिवसाचा दुखवटा पाळून सर्व विधी पूर्ण करणारhttps://t.co/n8sF7lFYuu
— Rajesh Tope (@rajeshtope11) August 2, 2020
राजेश टोपे यांच्या मोतोश्री मृत्यूची बातमी कळताच अनेक राजकीय नेत्यांनी शारदाताई टोपे यांना श्रद्धांजली वाहली आहे. एकीकडे आईची काळजी घेणे आणि दुसरीकडे करोनाची लढाई लढणे अशी दुहेरी कसरत गेल्या महिनाभरापासून टोपे यांची सुरू होती. राज्यात गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाची परिस्थिती समर्थपणे हाताळणाऱ्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेवर आईच्या मृत्यूमुळे दुखाचा डोंगर कोसळला आहे.