महाराष्ट्रात मुंबईसह अनेक जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचा दरात घट झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ही गोष्ट दिलासादायक असली तरी, सुखावून न जाता कोरोनाच्या तिस-या लाटेची तयारी करा अशा सूचना पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. कोरोनाची तिसरी लाट ही दारावर असून त्यासाठी मास्टरप्लान करा, असे निर्देशही नितीन राऊत यांनी प्रशासनाला दिले आहेत. सध्या राज्यात कोरोना रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजन, बेड्स, व्हेंटिलेटरचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचे योग्य ते नियोजन करण्याची गरज आहे असेही ते म्हणाले.
आरोग्यविषयक मनुष्यबळातही वाढ केली आहे. वर्षभरात केवळ आरोग्यावर काम सुरू असून नागपूर जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक दशलक्ष रुग्णसंख्येमागे साधारण बेड, आयसीयू बेडसह व्हेंटिलेटरच्या उपलब्धतेत महाराष्ट्रातील सर्व जिल्हयांना मागे सोडले आहे. मात्र तरीही तज्ज्ञ व शास्त्रज्ञांच्या मते येणारी तिसरी लाट ही अतिशय गंभीर असेल. यामध्ये ही यंत्रणा देखील तोकडी पडू शकते. त्यामुळे युद्धस्तरावर कामाला लागा. तिसऱ्या लाटेसाठी सज्ज व्हा, असे आदेश नितीन राऊत यांनी उच्चस्तरीय बैठकीत दिले.हेदेखील वाचा- Lockdown: महाराष्ट्रात 15 मे नंतर लॉकडाऊन वाढवायचा की थांबायचा? राजेश टोपे यांनी केले स्पष्ट
ऑक्सिजनची उपलब्धता यावरच पुढे बेडची उपलब्धता अवलंबून असणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात दहा ठिकाणी क्रायोजनिक ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा संकल्प पूर्ण करा. कोरोना रुग्णांसाठी 5 हजार जंबो सिलेंडर उपलब्ध करणे पुढच्या लाटेत आवश्यक ठरणार आहे. 1 हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर विकत घेतले जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक मोठ्या रुग्णालयात स्वतंत्र ऑक्सिजन पुरवठा हे उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे निर्देश राऊत यांनी बैठकीत दिले.
महाराष्ट्र राज्यात काल 53,605 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 82,266 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 43,47,592 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 6,28,213 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 86.03% झाले आहे.