Covid-19 Test: कोरोना विषाणूच्या वाढत्या घटना लक्षात घेता आता गर्दी असलेल्या भागातील नागरिकांची इच्छेविना कोरोना चाचणी (Covid-19 Test) करण्यात येणार आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने आदेश दिले आहेत. या आदेशानुसार मॉल, रेल्वे स्थानक, बस डेपो, बाजारपेठ, पर्यटन स्थळे आणि सरकारी कार्यालयांमध्ये रॅपिड अँटिजन टेस्ट केली जाऊ शकते. गर्दीच्या ठिकाणी उपस्थित लोकांच्या संमतीशिवाय ही तपासणी केली जाऊ शकते. एखाद्याने तपासणी करण्यास नकार दिल्यास, साथीचा रोग 1897 अंतर्गत गुन्हा मानला जाईल.
मीडिया रिपोर्टनुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई सेंट्रल, दादर वेस्टर्न आणि सेंट्रल, वांद्रे टर्मिनल, अंधेरी, बोरिवली आणि लोकमान्य टिळक टर्मिनस, कुर्ला या रेल्वे स्थानकांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. (वाचा - महाराष्ट्रात आज 27,126 कोरोना विषाणू बाधीत रुग्णांची नोंद; सध्या 1,91,006 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु)
दरम्यान, शॉपिंग मॉल्समध्ये दररोज 400 चाचण्यांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तसेच रेल्वे स्थानकांवर एका दिवसात 1 हजार चाचण्या करण्यात येणार आहेत. मॉलमधील चाचणीचा खर्च ज्यांची चाचणी करण्यात येईल, त्या व्यक्तीकडूनच घेण्यात येईल. याशिवाय इतर ठिकाणी होणाऱ्या चाचणीचा खर्च महापालिका करणार आहे. यापूर्वी सर्व सभागृह, चित्रपटगृह आणि कार्यालये 50 टक्के क्षमतेने चालवण्यात यावीत, असे आदेश सरकारने दिले होते.
मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईत शनिवारी तब्बल 2 हजार 982 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. तसेच 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.