Mumbai: कूपर रुग्णालयाचा गलथानपणा; महिलेच्या मृत्युच्या 5 दिवसानंतर कोरोना विषाणूची लागण झाल्याचा रिपोर्ट, अंत्यसंस्काराला 200 हून अधिक जणांची उपस्थिती
Coronavirus (Photo Credits: PTI)

मुंबई (Mumbai) मध्ये एकीकडे कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाचे प्रमाण वाढत आहे, तर दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. मात्र शहरामध्ये रुग्णांबाबत होणाऱ्या गोंधळाचे प्रमाण वाढत आहे. मुंबईत रुग्णालयाच्या एका मोठ्या दुर्लक्षतेचे एक प्रकरण समोर आले आहे. मुंबईच्या बीएमसी (BMC) रुग्णालयात 5 दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या महिलेचा कोरोना अहवाल आता सकारात्मक आला आहे. महत्वाचे म्हणजे या महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी (Funeral) 200 हून अधिक जण उपस्थित होते, अशी माहिती परिवारातील सदस्यांनी दिली आहे. ही बाब मुंबईच्या कांदिवली परिसरातील, जय भारत सोसायटीमध्ये घडली आहे. येथे राहणाऱ्या 28 वर्षीय गर्भवती महिलेचा बीएमसी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता.

इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेचा मृतदेह कांदिवलीच्या ‘जय भारत सोसायटी’मध्ये आणण्याला आला. त्यानंतर कुटुंबीयांनी हिंदू प्रथेनुसार अंत्यसंस्कार केले. यासाठी व मृतदेहाचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी शेकडो लोक जमा झाले होते. एवढेच नाही तर हा मृतदेह इमारतीखालीच काही तास ठेवण्यात आला होता, जो पाहायला अनेक लोक आले होते. अंत्यसंस्कारानंतर 5 व्या दिवशी, महिलेचा कोरोना अहवालात सकारात्मक आल्याची माहिती मिळाली व त्यानंतर एकाच खळबळ उडाली. (हेही वाचा: मुंबईच्या Cooper Hospital मध्ये रुग्णाच्या मृत्यूमुळे संतप्त नातेवाईकांचा गोंधळ; रुग्णालय आणि मनपा अधिकाऱ्यांवर केलेल्या आरोपांबाबत BMC ने दिले स्पष्टीकरण)

आपल्याला कोरोना तर झाला नाही ना, या विचाराने इमारतीमधील लोक घाबरले आहेत. बीएमसी आरोग्य विभागाची टीम आता मृत महिलेच्या कुटूंबाची चौकशी करीत आहे. ‘चेस द व्हायरस’ अंतर्गत अंत्यसंस्कारात सामील झालेल्या उर्वरित लोकांचा शोध घेणे चालू आहे. अंत्यसंस्कार झाल्यावर पाच दिवसांनंतर रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आता मृताच्या कुटूंबाने कूपर रुग्णालयावर दुर्लक्षेतेचा आरोप केला आहे. कुटूंबीयांचे म्हणणे आहे की, ‘जर आमचा सदस्य कोरोना पॉझिटिव्ह होती, तर तिचा मृतदेह आम्हाला का दिला? आम्ही मृतदेहाची मागणी केली नव्हती. त्यामुळे या घटनेमुळे जर का कुणाला कोरोना विषाणूची लागण झाली, तर त्याला कूपर रुग्णालयाच जबाबदार असेल.’

दरम्यान, नुकतेच कूपर रुग्णालयाकडून इंजेक्शन दिल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा दावा एका कुटुंबाने केला होता.