Maharashtra: काँग्रेस आगामी निवडणुका स्वबळावर लढणार? महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले स्पष्ट
उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात (Photo Credits- File Image)

महाराष्ट्रात शिवसेना (Shiv Sena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) स्थापना केली आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेसह राज्यातील दहा महापालिकेच्या निवडणुका समोर येऊन ठेपल्या आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये सुरुवातीपासूनच अनेक अंतर्गत मदभेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये हे तिन्ही पक्ष एकत्र असतील का? असा सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे. एकीकडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. तर, दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीचे संकेत दिले आहेत. यामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडेल का? यावर काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी स्पष्ट केले आहे.

नुकतीच बाळासाहेब यांनी टीव्ही9 वृत्तवाहिनीला मुलाखात दिली आहे. त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या भविष्यातील वाटचालीबद्दल भाष्य केले आहे. दरम्यान, ते म्हणाले की, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीची स्थापना केली आहे. आमचे सरकार जनतेसाठी काम करत आहे आणि पुढे करत राहणार. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी गुरुवारी (17 जून) बैठक बोलावली होती. या बैठकीत स्वबळावर निवडणूक लढण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीला आणखी साडे 3 वर्ष वेळ आहे. सरकार 3 पक्षांचे आहे. जे प्रश्न निर्माण झाले, त्यावर मार्ग काढतो, त्यामुळे प्रश्न सुटलेले दिसतात, असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावरून पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंडीला सरकारने परवानगी द्यावी, पंकजा मुंडे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री पदावरून पेटलेल्या वादानंतर शिवसेनेने भाजप सोबतची 30 वर्षांची युती तोडली. त्यानंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यासी हात मिळवणी करून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. परतु, महाविकास आघाडीत 3 भिन्न विचारधारेचे पक्ष असल्यामुळे हे सरकार जास्त काळ टिकणार नसल्याची टीका विरोधकांकडून वारंवार केली जात आहे. परंतु, हे सरकार पुढील अनेक वर्ष सोबत काम करणार असल्याचे सत्ताधारी पक्षांमधील अनेक नेत्यांचा विश्वास आहे.