काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बी.जे.खताळ पाटील (B.J.Khatal Patil) यांचे सोमवारी मध्यरात्री वृद्धापकाळाने निधन झाले. ते 101 वर्षांचे होते. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी अनेक चळवळींत सहभाग घेतला होता. तसेच त्यांचे राजकारणातील काम ही वाखाखण्याजोगे होते. वयाची शंभरी ओलांडलेल्या या महान नेत्यांनी सोमवारी मध्यरात्री 2 वाजून 10 मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. आज दुपारी 4 वाजता प्रवरा नदी तिरावरील अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
संगमनेरचे माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील यांचा गांधीजींच्या ‘चले जाव’ चळवळीत सहभाग होता. १९६२ ते ८० अशा चार विधानसभा निवडणुका काँग्रेस पक्षातर्फे त्यांनी संगमनेर मतदारसंघातून जिंकल्या. २० वर्षे ते आमदार होते. या काळात ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण, मारोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण व बॅरिस्टर ए. आर. अंतुले या पाच मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात सहकार, नियोजन, महसूल, कायदा व न्याय, अन्न व नागरी पुरवठा, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे आदी खात्यांचा कारभार त्यांनी पाहिला आहे. प्रत्येक खात्यावर त्यांची विशेष अशी छाप होती. त्यांच्या कारकिर्दीत सर्वाधिक धरणांची निर्मिती झाली होती. हेही वाचा- Maharashtra Assembly Election 2019: काँग्रेस-राष्ट्रवादीचे जागावाटपचे गणित ठरलं, प्रत्येकी 125 जागा तर मित्रपक्षांना 38 जागा
कोल्हापूरचे दुधगंगा-वेदगंगा, सांगलीचे चांदोली-नांदोली, पुण्याचे चासकमान , नांदेडचे विष्णुपुरीसह राहुरीच्या मुळा धरणाला गती देण्याचे काम त्यांच्याच काळात झाले होते. कडक शिस्त, कमालीची तत्वनिष्ठा आणि प्रामाणिकपणा यामुळे त्यांची राज्यात विशेष ओळख होती.
महाराष्ट्राच्या राजकारणासोबतच साहित्य क्षेत्राच्या पटलावरील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेल्या बी. जे. खताळ पाटील यांनी ‘गुलामगिरी’, ‘धिंड लोकशाहीची’, ‘गांधीजी असते तर’, ‘अंतरीचे धावे’ व ‘लष्करी विळख्यातील पाकिस्तान’ अशी पाच पुस्तके त्यांनी लिहिली. विशेष म्हणजे वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांनी लिहिलेल्या 'माझे शिक्षक' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळाही अलीकडेच पार पडला होता.