Maharashtra Assembly Election 2019: काँग्रेस-राष्ट्रवादीचे जागावाटपचे गणित ठरलं, प्रत्येकी 125 जागा तर मित्रपक्षांना 38 जागा
Prithviraj Chavan (Photo Credits: Facebook)

Assembly Election 2019: विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम लवकरच सुरु होणार असून त्यासाठी पक्षांचा जागावाटपाचा कार्यक्रम सुरु झाला आहे. यात काँग्रेस-राष्ट्रवादी (Congress NCP) पक्षाने आपले जागावाटपाचे गणित मांडले असून विधानसभेच्या 288 जागांपैकी 125 जागा काँग्रेस तर 125 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक लढविणार आहे. तर उरलेल्या 38 जागा मित्रपक्षांना देण्यात येणार आहे, अशी घोषमा काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी पत्रकार परिषदेत दिली. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा फॉर्म्युला ठरविण्यात आला असल्याचे त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.

येत्या 1-2 दिवसांत विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष कसून तयारीला लागले असून महाजनादेश यात्रा, शिवस्वराज्य यात्रा, जनआशिर्वाद या यात्रांच्या माध्यमातून आपले शक्तीप्रदर्शन केले आहे. यात भाजप आणि शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू असल्याने या पक्षांची युती होणार की नाही, असा प्रश्न सर्वांना पडलेला असताना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या आघाडीवर मात्र शिक्कामोर्तब झाले आहे. हेही वाचा-Maharashtra Assembly Elections 2019: विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेनेला भाजपाने घेतलेला जागा वाटपाचा फॉर्म्युला पटणार?

गेल्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष जर एकत्र लढले असते तर गेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल वेगळा लागला असता, असे सांगत मागची चूक आता न करता दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी अघाडीवर शिक्कामोर्तब केले असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.

चव्हाण म्हणाले, दोन्ही पक्ष प्रत्येकी १२५ जागा लढविणार आहे. या जागांमधील ५ ते ६ जागा अशा आहेत, ज्या राष्ट्रवादीकडे असून कॉंग्रेस त्या जागांची मागणी करत आहे. तर, ५ ते ६ जागा ज्या कॉंग्रेसकडे आहेत. त्या जागांची मागणी राष्ट्रवादी करत आहे. त्यामुळे सामंजस्याने या जागांची अदलाबदली करण्यात येईल. त्याच प्रमाणे उर्वरीत ३८ जागा मित्र पक्षांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.