काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीसाठी ( Congress Party President Elections) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस मधुसूदन मिस्त्री (Madhusudan Mistr) यांनी गुरुवारी अधिकृत अधिसूचनेद्वारे आगामी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. पक्षाच्या नवीन अध्यक्षासाठी उपरोक्त निवडणुका सर्व PCC मध्ये 17 ऑक्टोबर रोजी होणार आहेत, ज्यांचे निकाल मतमोजणीनंतर लगेच 19 ऑक्टोबर रोजी जाहीर केले जातील. काँग्रेस अध्यक्ष पदासाठी आतापर्यंत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि काँग्रेस नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी पक्षाच्या सर्वोच्च पदासाठी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. तथापि, पक्षाचे नेते दिग्विजय सिंह (Dagvijay Singh) हे देखील आज दिल्लीत आले आहेत. दिग्वीजय सिंह पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकीपूर्वी ते पक्षाच्या अंतरिम प्रमुख सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या निवडणुकीत पराभव झाल्याने नैतिक जबाबदारी स्वीकारुन राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून काँग्रेसचे अध्यक्षपद रिक्त आहे. यापुढे काँग्रेस पक्षात गांधी घराण्यातील अध्यक्ष नसावा, असे म्हणत राहुल यांनी स्वत:च या निवडणुकीत स्वारस्य नसल्याचे जाहीर केले आहेत. तेव्हापासून जेष्ठ नेत्या सोनिया गांधी या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा म्हणून कार्यभार पाहात आहेत. (हेही वाचा, Sushil Kumar Shinde: सुशीलकुमार शिंदेंकडून कॉंग्रेसला घरचा आहेर म्हणाले कॉंग्रेस पक्षातील लोक कटकारस्थानी)
दरम्यान, काँग्रेसमधील अनेक जाणकारांनी पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष असावा आणि तो प्रत्यक्ष थेट निवडणुकीतून आलेला असावा, अशी मागणी वारंवार केली आहे. तरीही प्रदीर्घ काळ काँग्रेसमध्ये अध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडत नव्हती. अखेर पक्षांतर्गत बराच खल झाल्यानंतर आता अध्यक्ष पदासाठी निवडणूक जाहीर होत आहे.
राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाध्यक्ष पदासाठी सर्वाधिक पसंतीचे उमेदवार मानले जात होते. त्यामुळे राहुल गांधी यांनीच ही निवडणूक लढवावी, अशी मागणी काँग्रेस पक्षातून होत होती. मात्र, राहुल गांधी सध्या 'कश्मीर ते कन्याकुमारी' अशा प्रदीर्घ भारत जोडो यात्रेवर आहेत. त्यामुळे सध्या तरी ते काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्याच्या भूमिकेत नाहीत, असा अर्थ काढला जातो आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची धुरा कोणाकडे असेल याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. असेही मानले जात आहे की, काँग्रेसचे अध्यक्ष कोणीजरी झाले तरी, ते गांधी कुटुंबीयांच्या मर्जीतीलच असतील हे नक्की.