मध्य प्रदेश (Madhya Pradesh), राजस्थान (Rajasthan), छत्तीसगड (Chhattisgarh) या तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने भाजपचा पराभव करून विजय मिळवला. या विजयाचा जल्लोष करण्यासाठी मुंबई काँग्रेस कमिटीतर्फे चेंबुर येथे जल्लोष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधान सभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम उपस्थित होते. त्याचबरोबर माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, माजी खा. भालचंद्र मुणगेकर, प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे, माजी आ. चरणसिंग सप्रा, माजी आ. युसुफ अब्राहमी, माजी मंत्री जावेद खान, माजी आ. बलदेव खोसा, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजन भोसले, पृथ्वीराज साठे, विनायक देशमख, धनंजय खाटपे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व हजारोंच्या संख्येने नागरिकांनी या जल्लोष सभेला हजेरी लावली.
मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यात काँग्रेसने अशी मारली मुसंडी...
मध्यप्रदेश
मध्यप्रदेशामध्ये 230 जागांवर निवडणूक झाली. त्यापैकी कॉंग्रेसच्या पारड्यात 114, भाजपाला 109 आणि अन्य पक्षाला 7 जागा मिळाल्या आहेत. मात्र बहुमतासाठी 116 ही मॅजिक फिगर गाठणं कोणत्याच पक्षाला जमलं नाही. कॉंग्रेस बहुमतापासून अवघ्या 2 जागा दूर राहिला.
छत्तीसगड
छत्तीसगडमध्ये 90 जागांवर ही निवडणूक पार पडली होती. त्यापैकी कॉंग्रेसला 68 ,भाजपाला 15, BSP + पक्षाला 2 आणि इतर पक्षाच्या पारड्यात 5 जागा आल्या. मागील 15 वर्ष येथे भाजपाची सत्ता होती. मात्र काँग्रेसने इथेही मुसंडी मारत बहुमत मिळवले.
राजस्थान
राजस्थानमध्ये कॉंग्रेसला भाजपापेक्षा अधिक जागा मिळविण्यात यश आले. राजस्थानमध्ये कॉंग्रेसला 99, भाजपाला 73 तर इतर पक्षाच्या पारड्यात 27 जागा आल्या होत्या.