नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी शिक्षा सुनावलेले काँग्रेस नेते सुनील केदार यांना दिलासा मिळाला आहे. माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने (Nagpur Bench of Bombay High Court) त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी हा निर्णय दिला. 150 कोटींच्या नागपूर जिल्हा बँक घोटाळा (Nagpur Bank Scam) प्रकरणात कॉंग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवले होते. याप्रकरणी न्यायालयाने त्यांना 12 लाख 50 हजारांचा दंड आणि 5 वर्ष सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली (हेही वाचा - Sunil Kedar Found Guilty In NDCCB Scam: नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणात काँग्रेस आमदार सुनील केदार दोषी)

सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आणि शिक्षेला स्थगिती देण्याच्या अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी झाली. ज्यामध्ये एक लाखाच्या जातमुचलक्यावर सुनील केदार यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही दिले आहेत.

सुनील केदार यांच्या जमीन अर्जावर दोन्ही पक्षाकडून जोरदार युक्तिवाद झाला. सुनील केदार यांच्याकडून प्रसिद्ध वकील सुनील मनोहर यांनी युक्तिवाद केला तर राज्य सरकारकडून वकील राजा ठाकरे यांनी बाजू मांडली.